बदलापूर : लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या बदलापूरमधील नेपाळी कुटुंबीयांना घरी जाता येत नसल्याने त्यांना मदत करावी असे आवाहन नेपाळी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला शिवसेनेने प्रतिसाद दिला असून येथील १५० नेपाळी कुटुंबांना आधार देण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. त्या कुटुंबाला दुपारच्या जेवणाची आणि महिनाभर पुरेल इतके धान्य देण्यात आले आहे.ठाणे जिल्ह्यात कामानिमित्त आलेले शेकडो नेपाळी कुटुंब हे उपासमारीचे बळी पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या नेपाळी कुटुंबीयांनी नेपाळी महासंघाकडे मदतीची मागणी केली होती. मात्र नेपाळी महासंघही लॉकडाउनमुळे सर्व ठिकाणी मदत देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्या त्या शहरातील दानशूर व्यक्तींनी नेपाळी कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले होते.बदलापूरमध्येही १५० नेपाळी कुटुंब असून त्यातील २० कुटुंबीयांनी नेपाळी महासंघाकडे मदतीची मागणी केली होती.या आवाहनाला साद देत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी या २० कुटुबीयांसोबतच बदलापूरमध्ये कामानिमित्त आलेल्या इतर १३० कुटुंबांनाही दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी महिनाभर पुरेल इतके धान्यवाटप केले आहे. तसेच त्यांना लॉकडाउन संपल्यावर त्यांच्या गावी जाण्याची इच्छा असल्यास त्यासाठीही मदत केली जाणार आहे.
नेपाळी कुटुंबांच्या मदतीसाठी सेनेने पुढे केला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 1:04 AM