ठाणे : ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजार कोटींचा चुराडा होऊनही ठाणेकरांना सुविधा मिळाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.या वेळी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध न करता, २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काय केले, याचा ऊहापोह करणारा ‘पंचनामा’ जनतेसमोर सादर केला. या वेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. आव्हाड पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीच्या राज्यात ठाण्याला राज्य सरकार आणि केंद्राचा कोट्यवधींचा निधी मिळाला. मग, शिवसेनेने ठाण्याला काय दिले, काय केले अन् काय आणले, हा आमचा शिवसेनेला सवाल आहे. केेंद्र आणि राज्याकडून आलेल्या २० हजार कोटींच्या निधीत शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून आता ठाणेकर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीलाच ठाण्याची सत्ता देतील आणि ठाण्यात आघाडीचा महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर आनंद परांजपे यांनी एवढ्या निधीचा खर्च कोठे केला, याचा हिशेब जनतेला देणे गरजेचे असल्याचे सांगितले.शिवसेनेनी ठाण्याची कचराकुंडी केली. कळवा येथील मेडिकल कॉलेजचा बट्ट्याबोळ केला. या पांढऱ्या हत्तीला पोसून येथे शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला. ठाणे महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले. साधा कोपरीचा पूल यांना बांधता येईना आणि रिंगरूटची भाषा बोलून दाखवतात, असे आव्हाड म्हणाले. एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना ठाण्याचे पालकत्व स्वीकारून १००० दिवस झाले, मात्र त्यातील १५ मिनिटेही ठाणेकरांसाठी देता येत नसतील, तरया पालकमंत्र्यांचे करायचे काय? ठाण्याचे डम्पिंग होत असताना हे पालकमंत्री काहीच करू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. रिपाइं नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते जर मतदानानंतर शिवसेना आणि भाजपाला पुन्हा एकत्र आणणार असतील, तर ते आता आधुनिक चाणक्य झाले, असेच म्हणावे लागेल, असे आव्हाड म्हणाले. (प्रतिनिधी) खर्च कोणासाठी केला याची उत्तरे द्याठाणे महानगरपालिकेचा २०१६-१७ वर्षाचा २५४९.८२ कोटी एवढा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये पाण्यासाठी २५०.९८ कोटी, घनकचऱ्यासाठी २१८.३३ कोटी, मलनि:सारणासाठी ५९.७५ कोटी, परिवहनसाठी ४५.३६ कोटी आणि परिवहनच्या वित्तीय तुटीसाठी २४ कोटी, आरोग्यासाठी केवळ कळवा हॉस्पिटलसाठी १७.८७ कोटी व आरोग्य केंद्रांसाठी ५९.१९ कोटी, रस्तेबांधणी दुरु स्ती आदी कामांसाठी ८४२.१६ कोटी ठाणेकरांच्या एवढ्या निधीचा चुराडा एक वर्षात केला आहे. जर एवढा निधी खर्च झाला असेल, तर तो कोणत्या कामांमधून दिसतो आहे. कोणासाठी खर्च केला गेला, याची उत्तरे शिवसेनेने देणे गरजेचे असल्याचे मत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
२५ वर्षांत सेनेने केला २० हजार कोटींचा चुराडा
By admin | Published: February 20, 2017 5:57 AM