भार्इंदर : पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक येत्या १६ डिसेंबर रोजी पार पडणार असुन त्यासाठी गुरुवारी (१० डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शिवसेनेकडून हरिश्चंद्र आमगावकर, काँग्रेसकडून मर्लिन डिसा तर भाजपा व राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर शिवसेनेचेच प्रभाकर म्हात्रे अशा तीन जणांनी उमेदवारी अर्ज नगरसचिव हरिश पाटील यांच्याकडे सादर केले आहेत. शिवसेनेतच बंडखोरी झाल्याने या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.गतवेळचे सभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला जाऊ न देता ते भाजपाकडे खेचण्यात आ. नरेंद्र मेहता यांना यश आले होते. त्यावेळी नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत त्यांनी २०१५-१६ व २०१६-१७ चे सभापतीपद देण्याचे लेखी आश्वासन शिवसेनेच्या नेत्यांना दिले होते. त्यानुसार यंदाच्या सभापतीपदावर आपसुकच शिवसेनेचा दावा असला तरी त्याला छेद देण्यासाठी त्यांनी राजकीय खेळीला सुरुवात केल्याचे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी निदर्शनास आले. शिवसेनेने आमगावकर यांना यंदाही उमेदवारी दिली असून त्यांच्यासमोर भाजपाने कुरघोडी करण्याच्या उद्देशाने प्रथमच राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून शिवसेनेच्याच प्रभाकर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाकडे बविआ, अपक्षासह सहा तर राष्ट्रवादीकडे चार सदस्य आहेत. स्थायीतील एकूण १६ सदस्यांत भाजपा-राष्ट्रवादी या नवीन मित्रपक्षांकडे एकूण १० सदस्य असल्याने म्हात्रे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यात मेहता यांची राजकीय खेळी सरस ठरणार असून तसे झाल्यास युतीतील मतभेद चव्हाट्यावर येऊन ती दुभंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरुन काँग्रेसच्या मर्लिन डिसा व म्हात्रे यांच्यात लढतीचे सोपस्कार पार पडण्याचे संकेत येथील राजकीय विश्लेषकांकडून देण्यात येत आहेत. म्हात्रे हे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा. राजन विचारे यांचे समर्थक तर आमगावकर हे मीरा-भार्इंदर शहर संपर्क प्रमुख आ. प्रताप सरनाईक यांचे समर्थक मानले जातात. (प्रतिनिधी)
स्थायी सभापतिपदासाठी शिवसेनेत बंडखोरी
By admin | Published: December 11, 2015 1:17 AM