पनवेल : पनवेल महानगर पालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा एकंदरीत अंदाज आहे. भाजपासोबत न जाण्याच्या निर्णयाबाबत अजूनही अधिकृत घोषणा सेनेने केलेली नसली तरी आपल्या इच्छुक उमेदवारांना निवडणुकीत महत्त्वाचे डावपेच शिकविण्यासाठी सोमवारी २० प्रभागात एकाच वेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांमार्फत बैठक घेतली. या बैठकीत इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या रणनीतीबद्दल माहिती देण्यात आली. मुंबईच्या प्रचार पद्धतीचा अवलंब पनवेल महानगरपालिकेत केला जाणार आहे असे एकं दरीत चित्र आहे.पनवेल महानगर पालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी शेकापसोबत जावून महाआघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे भाजपा सेनेसमोर या महाआघाडीचे कडवे आव्हान असणार आहे. यामुळेच दोन्ही पक्षातील काही नेते युतीसाठी आग्रही होते. मात्र सेनेच्या गोटात स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा जास्त आग्रह असल्यामुळे पक्ष नेतृत्व स्वबळावर निवडणूक लढण्यास ठाम असल्याचे बोलले जाते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवार म्हणून सामोरे जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी सेनेने आपले वरिष्ठ नेते थेट मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधून पाठविले आहेत. मुंबई, ठाण्यात सेना अव्वल आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही महानगरपालिकेवर सेनेचा झेंडा फडकला असल्याने या पालिका निवडणुकीत सेना कशाप्रकारे मतदारापर्यंत पोहचली याची २० प्रभागातील इछुक उमेदवारांना माहिती दिली जात आहे. या बैठकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणचे विभाग प्रमुख, नगरसेवक, माजी नगरसेवक आदी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. प्रचारादरम्यान सोशल मीडियाचा वापर, आपण केलेली कामे मतदारापर्यंत पोहचवणे आदींसह विविध गोष्टी या कार्यकर्त्यांना सांगण्यात आल्या. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील सेनेचे निम्मे मंत्री पनवेलमध्ये सभा घेणार आहेत. (प्रतिनिधी)
सेनेची मुंबई, ठाण्यातील प्रचाराची रणनीती
By admin | Published: April 27, 2017 12:10 AM