ठाणे : ठाणे शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांनी सादर केलेले जातप्रमाणपत्र विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले, तसेच ते सरकारजमा करण्यात आले. डिसोझांविरोधात न्यायालयात रीतसर तक्रार दाखल करावी, असे आदेश देत पालिका आयुक्तांनी याबाबत कारवाई करण्याचे समितीने सांगितले. माजिवडा प्रभाग १९ अ मधून शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले होते. त्यांनी माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांचे जातप्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार भोईर यांनी कोकण विभाग जातपडताळणी समितीकडे केली होती. डिसोझांनी १३ मे २०११ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जातीचा दाखला घेतला. त्यानुसार शाळेच्या दाखल्यात जात दर्शवण्यासाठी ७ डिसेंबर २०११ रोजी शाळेकडे अर्ज करून जातीची नोंद केली होती. जातपडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला रद्द करून त्याची प्रत पालिका आयुक्तांना पाठवून दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. दरम्यान, डिसोझा यांनी उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण दोन्हीही न्यायायलयांनी समितीचे म्हणणे योग्य असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
सेनेच्या डिसोझा यांचे नगरसेवकपद रद्द होणार
By admin | Published: February 04, 2016 4:23 AM