ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरक्षित जमिनीवरून जात असलेल्या बुलेट ट्रेनलाराष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महासभेत विरोध करतील, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मांडली. एकीकडे मध्य रेल्वे रडतरखडत चालत आहे. त्याकडे खासदारांचे लक्ष नाही. मात्र, बुलेट ट्रेनसाठी पायघड्या टाकल्या जात आहेत, हे राष्ट्रवादी सहन करणार नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले. दुसरीकडे आता शिवसेनेनेही याला विरोध केला असून लोकांवर अन्याय होत असेल तर या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे.बुलेट ट्रेनसाठी ठाणे पालिका क्षेत्रातील ३६.६२ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र, ही जागा विकास आराखड्यात विविध प्रकल्पांसाठी आरक्षित असल्याने आरक्षणांमध्ये फेरबदल करावे लागणार आहेत. या संदर्भात राज्य शासन स्तरावर एक बैठकही झाली होती. गेल्या वर्षी पालिकेने जागा आरक्षण फेरबदलांचा प्रस्ताव तयार करून तो महापौरांकडे पाठविला होता. मात्र, या प्रकल्पास विरोध असल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने तो सभेच्या विषयपत्रिकेवर घेतला नव्हता. आता शिवसेनेने १९ जूनच्या सर्वसाधारण सभेपुढे तो मंजुरीसाठी आणला आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला.महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक होणार आहे. या ट्रेनच्या मार्गासाठी गावांमधील १९.४९ हेक्टर तर स्थानकाच्या उभारणीसाठी म्हातार्डी गावातील १७.१३ हेक्टर इतके भूसंपादन करावे लागेल. यासाठी आधी शिवसेनेने विरोध केला होता. आता बुलेट ट्रेनसाठी पायघड्या टाकण्यात येत आहेत.नव्याने निवडून आलेले खासदार मध्य रेल्वेच्या समस्यांकडे पाठ फिरवत आहेत. ठाण्याच्या विस्तारित रेल्वे स्थानकाची एक वीटही पुढे सरकत नाही, ठाणे ते दिवा दरम्यान ५ वी तथा सहावी रेल्वे लाइन, दिव्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला सुटणारी लोकल, कल्याण टर्मिनसच्या समस्या या बाबींकडे आता या खासदारांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, बुलेट ट्रेनला पायघड्या घालून भूमिपुत्रांच्या जमिनीवरनांगर फिरवला जात आहे. भूमिपुत्रांच्या शेतजमिनी संपादित करून त्यांना देशोधडीला लावण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोधअसून आमचे सर्व नगरसेवक महासभेमध्ये या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचेही आनंद परांजपे यांनी सांगितले.लोकांच्या हिताचा प्रस्ताव हवासुरुवातीला सेनेने या प्रस्तावाला विरोध केला होता. या प्रस्तावाला वाढता विरोध लक्षात घेऊन शिवसेनेने पुन्हा आपली भूमिका विरोधाच्या बाजूनेच असेल, असे स्पष्ट केले. लोकांच्या हिताचा प्रस्ताव नसेल, त्यांचे नुकसान होणार असेल तर त्याला आमचा विरोध असेल, असे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या विरोधानंतर सेनेची कोलांटउडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 1:07 AM