ठाणे : नोकरीचे आमिष दाखवून संजीव देशपांडे (५८) या वृंदावन सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकाकडून मनीष आणि संजय सिंघानिया यांनी एक लाख १६ हजार ८५० रुपये उकळल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी घडला. वारंवार पाठपुरावा करूनही नोकरी किंवा पैसे न मिळाल्याने देशपांडे यांनी अखेर याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल केला आहे.देशपांडे हे अलीकडेच नोकरीवरून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर वेळ चांगला जाईल आणि अर्थार्जनही होईल, या हेतूने ते नोकरीच्या शोधात होते. त्यांनी आॅनलाइनही नोकरीसाठी प्रयत्न केला होता. हीच माहिती मिळाल्यानंतर मनीष आणि संजय सिंघानिया यांनी ८ जून २०१७ रोजी त्यांना फोन करून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, एका संकेतस्थळावर जाऊन त्यांना अर्ज भरण्यास या दोघांनी भाग पाडले. त्यानंतर, नोकरीसाठी एक लाख १६ हजार ८५० रुपयांची मागणी करून ती रक्कम त्यांना एका बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. पुढे नोकरीसाठी देशपांडे यांनी संबंधित फोनवर पाठपुरावा केला. मात्र, सुरुवातीला प्रतिसाद देणाऱ्या या भामट्यांनी नंतर त्यांचे फोनही घेतले नाही. कालांतराने तो फोनही बंद पडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशपांडे यांनी राबोडी पोलीस ठाण्यात १३ आॅगस्ट २०१८ रोजी माहिती तंत्रज्ञान ६६-ड अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘‘कोणीही नोकरी लावण्यासाठी पैसे घेत नाही. पैसे घेऊन नोकºया दिल्या जात नसतात. त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण खात्री करूनच अशा व्यक्तींशी संवाद साधावा. पण, अशा अनोळखींना कोणीही पैसे देऊ नये.’’रामराव सोमवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राबोडी