अंबरनाथ - पूर्व भागातील हरिओम पार्क परिसरात मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे बसलेले फेरीवाले यांची मुजोरी गेल्या काही वर्षांपासून वाढलेली आहे. या भागातील एकमेव महत्त्वाचा रस्ता असतानाही हा संपूर्ण रस्ता फेरीवाल्यांनी व्यापला आहे. वाहतुकीसाठी किमान जागा सोडावी एवढं भानही या फेरीवाल्यांना राहिलेलं नाही. फेरीवाल्यांच्या मुजोरपणाला सातत्याने विरोध करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली आहे. या मारहाणीमुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अंबरनाथ पूर्व भागातील हरिओम पार्क परिसरात गॅस गोडाऊन ते नवरे नगर हा विकास आराखड्यातील रस्ता अनेक वस्तीला जोडण्यात आला आहे शिवाजीनगर, महालक्ष्मी नगर, नवरे नगर, हरिओम पार्क, पाठारे पार्क, या भागातील रहिवाशांना हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले होते. प्रत्येक फेरीवाला हा रस्त्याच्या मध्यभागी उभा राहून व्यवसाय करीत असल्याने रहदारीमध्ये अडथळा निर्माण होत होता. या मुजोर फेरीवाल्यांच्या विरोधात याच भागातील रहिवासी रवींद्र आचार्य हे सतत तक्रार करीत होते. तक्रारीवरून फेरीवाले आणि आचार्य यांच्यामध्ये अनेक वेळा वादही झाला आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आचार्य यांनी फेरीवाल्यांना रस्त्यावर व्यवसाय करण्यास मज्जाव घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस एका फेरीवाल्यांनी त्यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. या मारहाणीत आचार्य यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर त्याच भागातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुजर फेरीवाल्यांच्या या दादागिरीमुळे सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. केवळ हरिओम पार्क नव्हे तर शहरातील अनेक भागात अशाच प्रकारे रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून अनेक फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. अशा मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.