लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. परंतु, ठाण्यात इतर वयोगटातील नागरिकांपेक्षा ज्येष्ठ
नागरिक मोठ्या संख्येने लस घेण्यात आघाडीवर आहेत. मागील १० दिवसांत चार हजार ६८८ ज्येष्ठांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील केवळ ७२० नागरिकांनीच ती घेतली आहे. त्यातही पैसे देऊन खाजगी रुग्णालयात लस घेणाऱ्यातही ज्येष्ठच आघाडीवर आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्ष वयोगटातील परंतु त्यांना काही व्याधी असतील अशांचे लसीकरण १ मार्च पासून सुरू झाले आहे. सुरुवातीला अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होणो, तासनतास रांगेत उभे राहणे अशा तक्रारी समोर येत होत्या. परंतु, आता ते प्रमाण काही अंशी का होईना कमी झाल्याचे दिसत आहे. शहरात आजघडीला शासकीय आणि खाजगी रुग्णालय मिळून ५१ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. त्यानुसार मागील १० दिवसात सात हजार ७९ नागरिकांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. यामध्ये शासकीय केंद्रावर पाच हजार ३२२ आणि खाजगी रुग्णालयात एक हजार ७५७ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
तरुणांपेक्षा ज्येष्ठ एक पाऊल पुढे
लस घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांची संख्या ही अधिक आहे. आतापर्यंत चार हजार ६८८ ज्येष्ठांनी लस टोचून घेतली असून ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ७२० जणांनीच ती घेतल्याचे दिसून आले आहे. त्यातही शासकीय बरोबर खाजगी रुग्णालयातही ज्येष्ठ आघाडीवर आहेत. त्यामुळे तरुणांपेक्षा ज्येष्ठ पाच पावले पुढेच असल्याचे दिसून आले आहे.
शासकीय रुग्णालयात किती - ५३२२
खाजगी रुग्णालयात - १७५७
ज्येष्ठ नागरिक - ४६८८
४५ ते ६० वयोगटातील -७२०
पैसे देऊन लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिकच पुढे
शासकीय पाठोपाठ ठाण्यात आता १० खाजगी रुग्णालयाच्या ठिकाणी लसीकरण सुरू झालेले आहे. या रुग्णालयातही लस घेण्यात तरुणांपेक्षा ज्येष्ठच आघाडीवर आहेत. खाजगी १० केंद्रावर एक हजार १७९ ज्येष्ठांनी आतापर्यंत लस टोचून घेतली आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील केवळ ३०४ जणांनी पैसे खर्च करून लस घेतली आहे.
कोरोनाचा जास्त धोका हा आम्हा ज्येष्ठांनाच अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आम्ही आमची काळजी घेऊन लस घेतली आहे. तिचा कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही.
(शुभदा देसाई - ज्येष्ठ नागरिक - महिला )
मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मी स्वत: पुढाकार घेऊन कोरोनाची लस घेतली आहे. आपल्याला या आजारापासून सुटका करून घ्यायची असल्याने मी लस घेतली.
(सुरेश पाठक - ज्येष्ठ नागरिक)