ठाणे : गेल्या आठ वर्षांपासून प्रत्यक्ष भेटून गप्पांच्या मैफिलीत फ्रेंडशिप डे साजरा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑडिओ -व्हिडीओ माध्यमातून आभासी सभा आयोजित करून साजरा केला.फ्रेंडशिप क्रिकेट क्लबने आपला हीरक महोत्सवी वर्धापन दिन (१९६० --२०२० ) करोना महामारीच्या संकट लक्षात घेऊन ऑनलाईन साजरा केला.
यानिमित्ताने रविवारी फ्रेंडशिप डे देखील साजरा करण्यात आला. यावेळी क्लबच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी एकत्र येऊन या क्लबची स्थापना केली. कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित बाळकृष्ण बापट ढाल स्पर्धेत 1968 साली फ्रेंडशिप क्रिकेट क्लब उपविजयी ठरले होते. 1960 साली या क्रिकेट कलबची स्थापना झाली. कालांतराने कुंभारवाडा येथील मैदान गेल्याने क्लबमधील मैत्रीची नाळ घट्ट रहावी यासाठी प्रल्हाद नाखवा, सुरेंद्र दिघे, बळवंत सकपाळ यांनी क्लबच्या मित्रांचा फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे ठरविले आणि गेल्या आठ वर्षांपासून प्रत्यक्ष भेटून एका हॉटेलमध्ये गप्पांच्या मैफिलीत हा दिवस साजरा करतात. यंदा मात्र त्यांनी घरीच राहून परंतु ऑडिओ -व्हिडीओ माध्यमातून हा दिवस साजरा केला. अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून मी जे.के. स्पोर्ट्स क्लब,स्पोर्टींग क्लब्स कमिटी,धी युनाइटेड स्पोर्ट्स क्लबतर्फे खेळलो. पण फ्रेंडशिप डेच्या माध्यमातून गेली आठ वर्षे जागतिक फ्रेंडशिप डे (मैत्री दिन ) साजरा करणारा माझा एकमेव क्रिकेटक्लब म्हणजे चेंदणी कोळीवाड्यातील फ्रेंडशिप क्रिकेट क्लब.मैत्रीचा हा अमोल ठेवा एफ.सी . सी.ने कायम जपावा, असे मनोगत ठाण्याचे ८७ वर्षीय क्रिकेटपटू मदन वामन नाखवा यांनी व्यक्त केले. वयाची पंचाहत्तरी पार केलेले हरेश्वर मोरेकर,जगदीश कोळी,रमाकांत कोळी यांचा, सत्तरी पार केलेले प्रदीप ठाणेकर, साठी पार केलेले नझील रोझारिओ, वैवाहिक जीवनाची पन्नाशी पार केल्याबद्दल मोहन नाखवा व कमलाकर कोळी यांचा जिज्ञासा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यवाहक प्रल्हाद नाखवा यांनी सूत्रसंचालन केले तर गुणलेखक बळवंत सकपाळ यांनी आभार मानले.१५ जणांनी आपला सहभाग नोंदविला. ------- गेल्यावर्षीच्या फोटो मेलवर