ठाणे: क्लिष्ट गुन्हयांसह अनेक खूनाच्या गुन्हयांचा छडा लावणारे डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांना ३० वर्षांच्या पोलीस सेवेतील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. उत्कृष्ठ तपासाबद्दल पोलीस महासंचालकांनीही त्यांचा गौरव केला असून पोलीस आयुक्तांचीही त्यांना १६० बक्षिसे मिळाली आहे. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावंत यांचा यानिमित्त विशेष गौरव करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक म्हणून १९८९ मध्ये सावंत हे पोलीस दलात मुंबईमध्ये रुजू झाले. मुंबईतील पंतनगर, ट्रॉम्बे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, साकीनाका आदी पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी आपल्या कामाची चमक दाखविली. या काळात केवळ हाणामारी, चोरीचे गुन्हेच नव्हे तर दरोडे, लूटमारीचे गुन्हेही त्यांनी उघड केले. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना नारायण उर्फ नारु रावत या छोटा राजनचा हस्तक असलेल्या गँगस्टरच्या त्यांनी मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्यावर अनेक खंडणीचे गुन्हे दाखल होते. पोलीस निरीक्षक म्हणून २००८ मध्ये बढती मिळाल्यानंतरही त्यांना पहिली नियुक्ती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील राबोडी पोलीस ठाण्यात मिळाली. राबोडी, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातील कल्याण युनिट, वाहतूक नियंत्रण शाखा आणि आता सप्टेंबर २०१८ पासून डायघर पोलीस ठाणे या सर्वच ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. २०१२ मध्ये नौपाडयातील हेमंत ठक्कर या इस्टेट एजंटच्या खून प्रकरणाचा यशस्वीपणे तपास करुन सहा जणांना त्यांनी अटक केली होती. २०१३ मध्ये कल्याण गुन्हे अन्वेषण विभागात असतांना त्यांनी अटक केलेल्या चार आरोपींकडून चोरीचे २१ तर सोनाली नेहती (३०) या महिलेच्या खूनाचा एक गुन्हा उघड झाला होता. या तपासाबद्दल त्यांना पोलीस महासंचालकांनीही गौरवले होते. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी येथे दाखल असलेल्या रेश्मा बिर्जे या खून प्रकरणाचा त्यांनी २० दिवसांमध्ये छडा लावला होता. उत्तम गुच्चाय या सराफाच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण आणि खून प्रकरणाचाही उलगडा करुन आरोपींना अटक केली होती. डायघरमध्ये त्यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून दाखल झालेल्या सर्व तिन्ही खूनाच्या गुन्हयांची उकल त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली आहे. आतापर्यत सुमारे ७६ क्लिष्ट गुन्हयांचा छडा लावल्याबद्दल त्यांना पोलीस आयुक्तांनी गौरविले आहे. या संपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना २०१९ या वर्षांचे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून राष्टपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यंदा हे पदक जाहीर होणारे आयुक्तालयातील ते एकमेव अधिकारी ठरले आहेत. राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि उपायुक्त डॉ. एस. स्वामी यांच्यासह सर्व वरिष्ठांचे आभार मानत कामगिरीचे सार्थक झाल्याची भावना ‘लोकमत’शी बोलतांना त्यांनी व्यक्त केली.
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल डायघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांना राष्ट्रपती पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:45 PM
अनेक गुंतागुंतीच्या गुन्हयांचा छडा लावण्यापासून ते छोेटा राजनचा हस्तक गँगस्टर नारायण उर्फ नारु रावत याच्या मुसक्या आवळण्यापर्यंत धडाकेबाज कामगिरी करणारे डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांना उत्कृष्ठ कामगिरीबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यंदा हे पदक जाहीर झालेले ठाणे पोलीस आयुक्तालयातील ते एकमेव अधिकारी ठरले आहेत.
ठळक मुद्दे १६० गुन्हयांमध्ये पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरवअनेक खूनाच्या गुन्हयांचाही लावला छडापोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही केले अभिनंदन