- जितेंद्र कालेकरठाणे: कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला तीन कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये मुंबईतून अटक करणारे तसेच ११३ गुंडांचा खात्मा करणारे चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या नोकरीचा अलिकडेच राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पोलीस महासंचालक कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत असून तो मंजूर झाल्यानंतर ते विधानसभा निवडणुकीसाठी अंधेरी किंवा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.१९८३ मध्ये पोलीस दलात सामील झालेले शर्मा हे सध्या ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातील खंडणी विरोधी पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी ४ जुलै २०१९ रोजीच पोलीस सेवेचा राजीनामा दिल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. मात्र हा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव असून निवडणुकीबाबत अजून नक्की ठरले नसल्याचा दावा त्यांनी केला. शर्मा यांचा बहुतांश कार्यकाळ हा मुंबईतील गुन्हे शाखा तसेच विशेष शाखेत गेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांनंतर ते निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.राजीनामा देण्यासाठीच ते गेल्या काही दिवसांपासून महासंचालक यांच्या कार्यालयात फे-या मारीत होते. परंतु राजीनाम्यावर त्यांनी फेरविचार करावा यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडून त्यांचे मन वळविण्याचेही प्रयत्न होत होते. शिवसेनेसह भाजपामधील अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. वसई आणि नालासोपारा परिसरात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरुद्ध युतीकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अंधेरी भागातून आपल्या पीएस फाऊंडेशनच्या मार्फत अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे याच मतदारसंघातून ते निवडणुकीला सामोरे जाण्याचीही अटकळ व्यक्त होत आहे. याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ आता शर्मा हेही राजकारणात आपले भविष्य आजमविणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. लष्कर ए तोएबाच्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुप्रसिद्ध गुंडाचा खात्मा शर्मा यांनी केला होता. गेल्या वर्षभरापूर्वी दाऊदचा इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही त्यांनी अटक केली होती.