ठाणे : अत्रे कट्ट्यावर बालगीतांचा पाऊस बरसला तो ‘गाणे गा रे पावसा’ या कार्यक्रमातून. ज्येष्ठ कवी प्रविण दवणे यांनी लिहीलेल्या बालगीतांचा सुरेल पाऊस कट्ट्यावरील रसिकांना अनुभवता आला. यावेळी दवणे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत बालगीते ही काळाची गरज आहे आणि आपल्या घराचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘गंमत जम्मत आमची ऐका जयदेवा’ या बालगीताने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर एकाहून एक सरस बालगीतांनी मोठ्यांची मने जिंकली. अंजली कानविंदे यांनी दवणे यांच्याशी संवाद साधला. दवणे म्हणाले की, नविन बालगीते हा प्रकार येत नाही. लहान मुले मोठ्यांच्या गाण्यांच्या तालावर नाचतात असे चित्र आज दिसून येत आहे. या वयात त्यांना चांगले वाईट कळत नसले तरी त्या गाण्यांचा त्यांच्यावर परिणाम होतो ही खंत दवणे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना व्यक्त केली. ते म्हणाले, कवी म्हणून मी स्वत: ही गाणी रेकॉर्ड केली. या गीतांना दीपक पाटेकर यांनी संगीत दिले. दिव्या दळवी, स्मृती केतकर, भक्ती बेलोसे, आकांक्षा गोळे या चिमुकल्यांनी ही गाणी सादर केली. सहा वर्षांच्या भक्तीने ‘पावसाची परी आलीया घरी’ या बालगीताने तर रसिकांची मने जिंकली. ‘सर सर होडीतून दूर दूर जाऊया’, ‘फांदिवरची फुलपाखरे आभाळात उडाली’, ‘सारेगमपधनीसा गाणे गा रे पावसा’, ‘पंख उघडा घ्या भरारी हो’ अशी अनेक बालगीते यावेळी सादर झाली. ‘वेळुची बासरी शीळ वाजवी वारा, लपला आहे सांगा कुठे तो मुरलीधर न्यारा’ या बालगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला. दवणे म्हणाले, लहान मुलांना अजिबात गृहित धरु नका ती मुश्कील आणि मिश्किल असतात. यावेळी प्रत्येक बालगीताला रसिकांनी टाळ््यांची दाद दिली.
ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर ज्येष्ठ रसिकांनी अनुभवला बालगीतांचा सुरेल पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 5:23 PM
ठाणे : अत्रे कट्ट्यावर बालगीतांचा पाऊस बरसला तो ‘गाणे गा रे पावसा’ या कार्यक्रमातून. ज्येष्ठ कवी प्रविण दवणे यांनी ...
ठळक मुद्दे अत्रे कट्ट्यावर ज्येष्ठ रसिकांनी अनुभवला बालगीतांचा सुरेल पाऊसबालगीते ही काळाची गरज आहे : प्रविण दवणेबालगीताने जिंकली रसिकांची मने