ठाणे : ज्येष्ठ करसल्लागार शरद भाटे यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. निर्मोही आणि निःस्वार्थी कर सल्लागार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना समाजसेवेची प्रचंड आवड होती.
ठाण्यातील नौपाडा भागात भाटे हे वास्तव्यास होते. १९६५ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी करसल्लागार म्हणून कामास सुरुवात केली. १९८१ मध्ये बँकेतील नोकरी सोडून ते पूर्णवेळ करसल्लागार म्हणून काम करू लागले. अर्थविषयक आकड्यांचे गणित ते सोप्या भाषेत समजावून सांगत. अर्थज्ञानावर त्यांनी वृत्तपत्रात लिखाण केले होते. त्यांची विनोदबुद्धी त्यांच्या लिखाणातून दिसून येत होती. ''अर्थ'' हा किचकट विषय अतिशय खुमासदार शैलीत ते मांडत. तसेच, अर्थसंकल्पातील बारकावे, करविषयक क्लिष्ट बाबी आणि सामान्य करदात्याला न समजणारे अवघड शब्द त्यांनी सहजसोप्या भाषेत सर्वसामान्य करदात्यापर्यंत पोहोचवले. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर परिपत्रकातील बारकावे, करामधील बदलाची माहिती ते स्वखर्चाने छापून करदात्यांना पत्राद्वारे पाठवित असत. गेले ४० वर्षे त्यांनी हा उपक्रम राबविला. आपल्या कमाईचा जास्तीत जास्त सदुपयोग भाटे यांनी समाजसेवेसाठी केला. बाबा आमटे यांच्या आनंदवनात सलग चार वर्षे ते राहिले आणि त्यांनी तिथे श्रमदान केले. माणगावच्या माउली वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचीही त्यांनी मनोभावे सेवा केली. अनेक सुविधा या वृद्धाश्रमाला स्वखर्चाने पुरवल्या. वेळेची शिस्त, स्वच्छ-स्पष्ट बोलणे, परखड विचार आणि स्वच्छतेची प्रचंड आवड त्यांना होती. त्यांच्या निधनामुळे ठाण्यातील सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो मेलवर
..............
वाचली