ठाणे : ठाण्यातील मागच्या पिढीतील नावाजलेले शिक्षक बाळकृष्ण गणेश चितळे तथा बाळासाहेब चितळे यांचे मंगळवारी वृद्धापकाळामुळे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.
ज. ए. ई.च्या विविध शाळांमधून ३८ वर्षांची शिक्षकी सेवा करीत असताना १९८३ ते १९८८ या कालावधीत निवृत्त होईपर्यंत चितळे ठाण्यातील मो. ह. विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. गणित विषयाचे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. १९६० साली महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षेत राज्यातून पहिले आलेले डों. हेमचंद्र प्रधान यांच्यापासून सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासारखे ठाण्यातील असंख्य नावाजलेले व्यक्ती त्यांचे विद्यार्थी आहेत. मो. ह. विद्यालयात शिक्षक असताना मुंबईच्या ज. ए. ई. संस्थेत त्यांनी संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सभासद, खजिनदार, सचिव आणि संस्थाचालक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. मो. ह. विद्यालयातील शिक्षकांच्या अभिव्यक्ती मंडळाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष आणि मार्गदर्शक होते. शाळेचा १९६७ साली संपन्न झालेला अमृत महोत्सव, १९९२ साली झालेला शतक महोत्सव आणि २००७ साली झालेला शतकोत्तर रौप्य महोत्सवी समारंभ हे सर्व समारंभ चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
चितळे यांना त्यांच्या दिवंगत पत्नी मंगला चितळे यांची दीर्घ सोबत लाभली होती. १९९१ साली त्यांनी सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संस्थापिका विमलाबाई कर्वे यांच्या आग्रहाखातर संस्थेच्या विश्वस्तपदाची जबाबदारी स्वीकारून संस्थेच्या दैनंदिन चोख आणि पारदर्शक हिशोब याचा पाया घातला होता.