कल्याण/ म्हारळ: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडून बाजार समितीच्या मुख्यालयात मतपेटी आली असता, मतपेटीतून चक्क धूर निघाला. हा प्रकार लक्षात येताच पेटी उघडून पाहिल्यावर त्यातील मतपत्रिका जळाल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या घटनेमुळे राजकारण आणखी तापले आहे.ज्या मतपेटीतील मतपत्रिका जळालेल्या अवस्थेत मिळून आल्या, ती मतपेटी बाराव्या गणातील होती. या गणातून एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेकापचे भीमराव देऊ पाटील, तसेच शिवशाही पॅनलतर्फे दत्ता गायकवाड हे निवडणूक लढवत आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ही मंडळी बाजार समितीच्या आवारात होती. हा प्रकार कळताच उमेदवारांनी त्याठिकाणी धाव घेतली. या घटनेची माहिती इतरत्र पसरताच बाजार समितीच्या आवारात मोठा जमाव जमला. त्याला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.उमेदवार भीमराव देऊ पाटील यांच्या वतीने बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले. पाटील हे विजयी होणार होते. त्यामुळे विरोधी उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यामुळेच विरोधकांकडून त्यांचा विजय रोखण्याकरिता मतपत्रिका जाळण्याचा घृणास्पद प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला. या गणातील मतपेटीतील मतपत्रिका जाळण्यात आल्याने या गणाची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे.हा प्रकार कळताच आमदार गणपत गायकवाड यांनी त्याठिकाणी धाव घेतली. आमदार गायकवाड यांनी सांगितले की, या गणातून आमच्या उमेदवाराला ७० टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे आम्हाला पराभवाची भीती नाही. मात्र, हा प्रकार निवडणुकीस काळिमा फासणारा आहे. मतपेटी सीलबंद करताना उमेदवारांना त्याठिकाणी सोडले नाही. त्यामुळे निवडणूक अधिकारी व पोलीस मतपत्रिका जळण्याच्या घटनेस कारणीभूत आहेत. त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आ. गायकवाड यांनी केली.बाजार समितीचे प्रशासक शहाजी पाटील यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, २९ मतदान केंद्रांपैकी २८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, बाराव्या गणातील मतपेटी बाजार समितीच्या स्ट्राँगरूममध्ये नेत असताना मतपेटीतून धूर येत असल्याचे दिसून आले. तेव्हा अधिकाऱ्यांनी मतपेटी उघडली. त्यात मतपत्रिका जळत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार कसा घडला, हे प्रथमदर्शनी सांगता येत नाही. मात्र, बाजार समितीच्या निवडणूक कायद्यान्वये या घटनेची पूर्ण कल्पना जिल्हाधिकाऱ्यांना दिली असून, राज्य निवडणूक आयोगासही कळवले असल्याचे पाटील यांनी सांगितले.संबंधित वृत्त/ पान २चार तरुण ताब्यातमतपत्रिका जाळल्याचा प्रकार उघडकीस आला, तेव्हा बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागेतून एक लाल रंगाची गाडी सुसाट वेगाने गेली. ती पाहून पोलिसांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीतील चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर मतपेट्या सील करण्यात आल्या. मतपेटी सील करण्यासाठी गरम लाखेचा वापर केला जातो. ही गरम लाख आतमध्ये सांडून मतपत्रिका जळल्या असाव्यात, असा अंदाज निवडणूक प्रक्रियेत सहभागी सूत्रांनी व्यक्त केला.
मतपत्रिका जाळल्याने खळबळ, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 4:44 AM