ठाणे : फिर्यादी राहुल प्रभाकर शेजवळ यांची पत्नी लता उर्फ राखी (३० वर्षे) हीच्या दुपारी १ ते दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी धारदार हत्याराने गळा कापून तिचा खून करणाऱ्या आरोपीस शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. बाबू उर्फ समीर गोगावले असे या आरोपीचे नाव आहे.
ठाणे पुर्वेत राहणाऱ्या शेजवळ यांच्या घरी २.१०.२०१६ रोजी ही घटना घडली. सुरूवातीला हा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम ३०२ ,३७६, ५११, ४५२ या कलमान्वये कोपरी पोलीस स्थानकात नोंदविला गेला होता. गुन्हा नोंदविल्यावर तपासात बाबू उर्फ समीर गोगावले याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आणि त्याच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल झाल्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात केस चालविण्यात आली आणि अखेर आज न्यायाधीश शिरसिकर यांनी त्याला जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली. दंड न भरल्यास एक महिना अधिक मजुरीची शिक्षा देण्याचे आदेश देण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील, सरकारी वकील क्षीरसागर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट अंमलदार, पोलीस हवालदार विजय सानप, म.पो.शि. सुशीला डोके व समन्स वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार उत्तम जंगले व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.