कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप नगरसेवक महेश पाटील यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती पाटील यांच्या वकिलांनी दिली आहे.जानेवारी 2018 मध्ये भिवंडी तालुक्यातील गणोशपुरी पोलिसांनी कॅश व्हॅन लुटल्याच्या दरोडा प्रकरणात सात जणांना अटक केली होती. या अटक आरोपींनी पोलिसांच्या तपासात माहिती दिली की, अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी भाजप नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय भाकडे यांनी दिली होती. या प्रकरणी पोलीस अधिकारी व्यंकटेश आंधळे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यावर नगरसेवक महेश पाटील यांनी कल्याण न्यायालयात व उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने ना मंजूर केला. त्यापश्चात महेश पाटील पोलिसांना शरण आले.पोलिसांनी त्यांना अटक केली. दहा दिवसाच्या पोलीस कोठडीपश्चात महेश पाटील यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र पोलिसांनी दाखल केले आहे. महेश पाटील यांच्यासह अन्य दोन जणांनी कल्याण न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. कल्याण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्या पश्चात महेश पाटील यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे माहिती कुणाल पाटील यांचे वकील संजय मोरे यांनी दिली आहे. कुणाल पाटील यांच्या वतीने वकिल मोरे यांच्यासह वरिष्ठ वकील मनोज मोहिते आणि सचिन थोरात यांनी काम पाहिले.
अपक्ष नगरसेवक हत्येची सुपारी प्रकरण, भाजपा नगरसेवक महेश पाटीलचा जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 7:13 PM