ठाणे : ठाणे कारागृहातील जुन्या कैद्यांना नव्याने येणाऱ्या कैद्यांमुळे कोरोनाची लागण होऊ नये या उद्देशाने अशा नव्या कैद्यांना कारागृहात पाठविण्याच्या आधी त्यांना दहा दिवस विलगीकरण केंद्रात ठेवले जात आहे. अशा नव्याने येणाऱ्या कैद्यांसाठी ठाणे महापालिकेने विटावा येथील शाळा क्रमांक ७२मध्ये विलगीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्रात सध्या २२५ कैदी उपचार घेत आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांनी घेतली आहे. त्यानुसार या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव १८ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.
ठाणे कारागृहात आजही हजारो कैदी विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत आहेत. सध्या कोरोनाचे सावट असल्याने त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. परंतु, रोजच्या रोज नवे कैदीही येथे येत असल्याने जुन्या कैद्यांना त्यांच्यापासून कोरोना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा नव्या कैद्यांना त्यांच्यापासून काही दिवस लांब ठेवून सुरक्षा कशी राखता येईल यादृष्टिकोनातून विचार झाला होता. त्यानंतर या संदर्भात महापालिकेशी चर्चा करून यावर तोडगा काढून महिनाभरापासून ठाणे महापालिकेने या कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र सुरू केले आहे.
ठाणे महापालिकेच्या विटावा येथील शाळा क्रमांक ७२ येथील इमारतीचे चार मजले सध्या यासाठी राखीव ठेवून नव्याने येणाऱ्या कैद्यांना पहिले दहा दिवस याच ठिकाणी विलगीकरणात ठेवले जात आहे. त्यानुसार येथे सध्या २२५ कैदी विलगीकरणात असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
काही दिवसांपूर्वी कारागृह अधीक्षकांनी या विलगीकरण केंद्राचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार येथील खिडक्यांना अतिरिक्त ग्रील बसविणे, कोल्यास्पिल शटर बसविणे, शौचालयात आवश्यक ती दुरुस्ती व रंगरंगोटी करणे अशी कामे केली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.