डोंबिवली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केडीएमसीकडून गेले दोन दिवस कल्याण डोंबिवलीत जंतुनाशक आणि धूरफवारणी करण्यात आली. रविवारी डोंबिवली पूर्वेकडील भागात जंतुनाशक फवारणी सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही दुचाकी घसरून चालक आणि अन्य व्यक्तींना मुका मार लागल्याची घटना घडली. कोरोनामुळे मनपाच्या वतीने घेण्यात येत असलेली खबरदारी योग्य आहे; मात्र रस्त्यावर औषध, जंतुनाशक फवारणी करताना विशेष काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा यानिमित्ताने दुचाकीस्वारांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात पुन्हा एकदा सोडियम हायपोक्लोराइड व जंतुनाशक फवारणीच्या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सहा प्रभागांमध्ये ही मोहीम राबविली असताना रविवारी सकाळ आणि दुपार या दोन सत्रांत ही मोहीम पार पडली. कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने पुन्हा एकदा विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून शनिवारी आणि रविवारी मनपा क्षेत्रात जंतुनाशक फवारणीची तसेच धूरफवारणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी ६.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी २ ते रात्री १० तसेच दिवसा रहदारीचा अडथळा असल्याने रात्री १० नंतर अग्निशमन दलाच्या वाहनांद्वारे सोडियम क्लोराइडची फवारणी दोन्ही दिवस करण्यात आली.
दरम्यान, रविवारी रात्री डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ विद्यालयासमोर अग्निशमन दलाच्या वाहनांद्वारे फवारणी सुरू असताना काही दुचाकी घसरून पडल्या. कल्याणमध्ये राहणारे कपिल पवार हेदेखील डोंबिवलीहून कल्याणकडे जात असताना त्यांच्या दुचाकीलाही अपघात होऊन तिघे जण खाली पडले. वेग कमी असतानाही दुचाकी घसरून तिघांना मुका मार लागल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या कानावर हा प्रकार टाकला असता, त्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
------------------------------------------------------