ठाणे – मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस दिल्यानंतर आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे, ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळेच अविनाश जाधव यांच्यावर अशाप्रकारे कारवाई करण्यात आली असा आरोप मनसेने केला होता, त्यानंतर शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी प्रसिद्धीसाठी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणार असाल तर शिवसेना जशास तसे उत्तर देईल असा इशारा दिला होता, त्यामुळे ठाण्यात शिवसेना-मनसे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं आहे.
त्यानंतर आता मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाणे महापालिका आणि पालकमंत्री एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप लावले आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, २५० नर्सेसला सहा महिन्याचा करार असताना ठाणे महापालिकेने तडकाफडकी काढलं, त्याठिकाणी नवीन कंत्राटदार नेमून त्या नर्सेसना कंत्राटदारांकडे काम करण्यास सांगितलं, त्या नर्सेसने मनसेकडे मदतीची मागणी केली, त्याबाबत मनसेचे अविनाश जाधव यांनी कोणतंही मारहाण न करताना विधायक मार्गाने आंदोलन केले, त्यावेळी अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस आली, पोलिसांवर प्रचंड दबाव टाकून ३५३ चा गुन्हा दाखल केला, अविनाशला बाहेर सुटू नये यासाठी यंत्रणा कामाला लावली, या आंदोलनासाठी इतका मोठा गुन्हा दाखल करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा शोध आम्ही घेतली तेव्हा धक्कादायक माहिती हाती लागल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच ओम साई आरोग्य केअर प्रा. लिमिटेड या चेंबूरमध्ये असलेल्या कंपनीला टेंडर दिलं आहे, या कंपनीचं रजिस्टर ऑफिस चेंबूरमध्ये एक गाळा आहे, त्याठिकाणी गेलो असता तेथे हा गाळा विकणे आहे असा बोर्ड लावला आहे. त्याचे मालक डॉ. शेख मुंब्रा,ठाणे येथे राहतात, ठाणे महापालिकेने १८ जुलैला टेंडर काढलं आणि ७ दिवसांत २५ जुलैला ओम साई कंपनीला टेंडर दिले, हे टेंडर देण्यासाठी किमान ३ वर्ष आरोग्य क्षेत्रातील अनुभव असावा अशी अट आहे, पण या ओम साई कंपनीचं रजिस्ट्रेशन १९ जून २०२० रोजी झालं आहे, या कंपनीला ३ महिनेही झाले त्यांना कंत्राट दिलं गेलं. या संपूर्ण भ्रष्टाचारामागे कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, मुंबई महापालिकेने १० हजार पीपीई किट्स रद्द केले ते ठाणे महापालिकेने घेतले, त्याचे बिल २ दिवसांत काढलं, कोरोनाच्या नावाखाली लुटण्याचे धंदे सुरु आहेत, हॉस्पिटल काढण्याचं टेंडर महापालिकेने काढलं आहे. तेदेखील ओम साईला कंपनीला देण्याचा घाट घातला आहे. ठाणे महापालिकेने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत मनसेकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन गुन्हा दाखल करावेत अशी मागणी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केली.
तर महापौरांना पालकमंत्र्यांच्या बाजूने बोलावं लागेल, ते गणितज्ज्ञ आहे पालिकेतील भ्रष्टाचार त्यांना टक्केवारीनुसार माहिती आहे. कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार करत आहेत, नर्सेसला काढलं नाही, अडीच महिने पगार दिला नाही, कोविड टेस्ट करायला हवी तीदेखील केली नाही, हा आरोग्याच्या विषयात पैसे खाणारे लोक असतील तर त्यांचे बुरखे फाडल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे. अविनाश जाधव यांच्यावर केसेस झाले म्हणून घाबरणार नाही, कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी १०० बसेस सोडणार नाही, स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी नेते लोकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला.