डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावरील वाहतूककोंडीला कंटाळलेल्या शहरातील नोकरदारांनी पश्चिमेतील रेतीबंदर येथून खाडीतून बोटीने प्रवास करून माणकोलीमार्गे ठाणे गाठण्याचा शॉर्टकट शोधला आहे. मात्र, अपुरी सुरक्षेची साधने व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीतून जात असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरण्याची भीती आहे.
मोठागाव रेतीबंदर येथून खाडीतून पलीकडील वेहेळे गावाच्या तीरावर जाऊन माणकोली व पुढे ठाण्याला जाता येते. या खाडीतून वर्षानुवर्षे छोटी फेरीबोट चालते. त्यातून पलीकडील ग्रामस्थ, भाजीपाला, मच्छीविक्रेते डोंबिवलीत येजा करतात. पण, सध्या वेळ वाचवण्यासाठी नोकरदार या मार्गाने प्रवास करत आहेत. फेरीबोटीतून एका वेळी पाचसहा प्रवासी व नावाडी जाणे अपेक्षित असताना त्याहून अधिक जण प्रवास करत आहेत. प्रवाशांसाठी लाइफ जॅकेट व सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
मागील वर्षी एका व्यावसायिकाने या खाडीतून मनोरंजनासाठी फेरीबोट सुरू केली होती. मात्र, प्रतिसादाअभावी ती बंद पडली. त्या बोटीत प्रवाशांसाठी लाइफजॅकेट होते. बोटही आकाराने मोठी होती. संरक्षक कठडे होते. परंतु, सध्या नोकरदार येजा करत असलेल्या बोटींमध्ये अशा सुविधा नाहीत. दररोज वाहतूककोंडीत अडकण्यापेक्षा तसेच नोकरीवर गदा येऊ नये, म्हणून हा धोक्याचा मार्ग काहींनी पत्करला आहे. मेरीटाइम बोर्डाने अधिकृतपणे हा जलमार्ग सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, केंद्राच्या जलवाहतुकीच्या योजनेतून नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी हीच सुवर्णसंधी मानून येथे तातडीने चांगल्या दर्जाच्या आणि सुरक्षित बोटी द्याव्यात. तसेच मुख्यमंत्र्यांनीही मेरीटाइम बोर्डाकडून परवानगी देऊन येथील नोकरदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे.क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्यास संबंधितांना समज दिली जाईल. नागरिकांच्या जीवाला प्राधान्य देत ही कार्यवाही तातडीने केली जाईल. - राजेंद्र मुणगेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णूनगर पोलीस ठाणे