ठाणे : तिळांच्या कमी झालेल्या दरांचा परिणाम यंदा लाडवांच्या दरांवर झाला आहे. घाऊक बाजारात जरी हे दर कमी असले तरी किरकोळ बाजारात अजून ते फारसे उतरलेले नाहीत. त्यांनी दरात वाढ न करता ते गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवल्याने संक्रांतीचा गोडवा वाढेल, अशी भावना विक्रेत्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. दर स्थिर असल्याने ठाण्याच्या घाऊक बाजारात संक्रांतीच्या काळात तब्बल १० हजार किलो लाडवांची उलाढाल होणार असल्याचे होलसेल विक्रेत्यांनी सांगितले. अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या संक्रांतीची तयारी जोर धरू लागली असून होलसेल बाजारात मोठ्या प्रमाणात तिळगुळाच्या लाडूंची खरेदी सुरू झाली आहे. दोन दिवसांनंतर घरोघरी लाडू बनविण्यास सुरुवात केली जाणार आहे. बाजारपेठांमध्ये मात्र आठवडाभरापूर्वीपासूनच लाडू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा तीळ स्वस्त झाल्याने लाडूचे दर वाढले नसल्याने त्यातल्या त्यात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. होलसेल बाजारात ९५ रुपये किलो, ११० रुपये किलो व १२० रुपये किलो अशा दरांत वेगवेगळ्या आकारांचे-प्रतींचे लाडू उपलब्ध आहेत, तर किरकोळ बाजारात १५० रुपये किलो, २०० रुपये किलो, ३२० रुपये किलो, ३६० रुपये किलो अशा दरांत ते उपलब्ध आहेत. मोठ्या दुकानांत ३०० किलो लाडवांची विक्रीतिळांचा दर गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी झाला आहे. तसेच गुळाचादेखील दर न वाढल्याने यंदा होलसेल बाजारात लाडूंचे दर कमी आहेत. गतवर्षी होलसेल बाजारात १३० रुपये व १४० रुपये किलोने लाडू विकले जात होते, अशी माहिती होलसेल विक्रेते प्रभू नाडर यांनी दिली. संक्रांतीच्या दिवशी एका मोठ्या दुकानात ३०० किलो, तर छोट्या दुकानात प्रत्येकी ५० ते १०० किलो लाडूंची उलाढाल होते, असा ताळेबंदही त्यांनी मांडला. तीळ-मावा बर्फी आणि मध घातलेले लाडूतीळगुळामध्ये यंदा काही नवे प्रकार बाजारात पाहायला मिळतात. तीळगूळ- शेंगदाण्याचे लाडू ३६० रुपये किलो, तिळाची मावा बर्फी आणि मावा-तिळाचे लाडू ५०० रुपये किलो, मध आणि तिळाचे लाडू ४०० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहेत.
दर घसरल्याने तिळांचे लाडूही यंदा बोलणार गोड!
By admin | Published: January 10, 2016 12:25 AM