लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : लॉकडाऊन काळात आरटीओ कार्यालये ही बंद होती. त्यामुळे त्या कालावधीत वाहन चालवण्यासाठी लर्निंग आणि पक्के लायसन्स अनेकांना काढता आले नाही. त्यामुळे कल्याण आरटीओ क्षेत्रातील वाहनचालकांची पंचाईत झाली होती. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून साधारण तीन महिन्यांत लायसन्स संदर्भातील दोन हजार प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली. त्यातील ३५० प्रकरणे नुकतीच निकाली काढल्याची माहिती आरटीओ तानाजी चव्हाण यांनी दिली.
प्रलंबित प्रकरणे मार्गी लागल्याने आता सोमवारपासून पुन्हा दैनंदिन कामे सुरू झाली आहेत. आता दिवसाला ४५० अर्ज घेऊन त्यांना सेवा देण्याचा मानस असल्याचे चव्हाण म्हणाले. गेल्या आठवड्यापर्यंत अवघे २२० अर्ज घेण्यात येत होते ; मात्र आता काही महिने तरी आधीपेक्षा दुप्पट संख्याबळ असल्याने आता अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याची क्षमता वाढवण्यात येत आहे. त्यामुळे लायसन्सच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
------------------------