ठाणे : सरस्वती मंदिर ट्रस्टने माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आणि माजी ज्येष्ठ शिक्षकांच्या क्रियाशील सबळ पाठिंब्यावर डिसेंबर महिन्यात दोन मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. रविवार १६ डिसेंबरला, ‘एक धाव शाळेसाठी’ रविवार २३ डिसेंबर रोजी स्नेहसंमेलन होणार आहे.
१६ डिसेंबरला या उपक्रमात २, ५ आणि १० कि.मी. ची धाव, धावण्याची संधी सहभागी व्यक्तींना मिळणार आहे. अर्थात यामध्ये धावणे हे अनिवार्य नसून सहभाग महत्वाचा आहे. शाळेचे वयोवृद्ध माजी मुख्याधापक आणि शिक्षक यात सहभागी होऊन आपल्या विद्यार्थांना प्रोत्साहित करणार आहेत. या बरोबरच ठाण्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक , क्रीडा, आणि सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती मराठी शाळेविषयी प्रेम दर्शविण्यासाठी सहभागी होणार आहेत. या उपक्रमामुळे केवळ नोंदणी शुल्काद्वारे निधी उभारला जाणार नाही तर प्रत्येक दौडपटू स्वत: त्याला जमेल एवढी एक विशिष्ठ रक्कम शाळेसाठी उभी करण्यासाठी वचनबध्द असणार आहे. नूतन वास्तू निधी उभारताना सरस्वतीयांचे स्वास्थ्य आणि आरोग्यसुद्धा, धावण्याच्या सरावाने संपन्न होणार आहे. रविवार २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता, माजी शिक्षक, विद्यार्थी, हितचिंतक आणि देणगीदार यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले असून, त्या प्रीत्यर्थ होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नाव आहे 'सेतू बांधा रे !’. या कार्यक्रमात शाळेचे नावाजलेले माजी विद्यार्थी गदिमा आणि सुधीर फडके यांच्या अविस्मरणीय गाण्याची सुरेल मैफल सादर करणार आहेत. या बरोबर अभिवाचन, नृत्य, नाट्य इत्यादी कार्यक्रमांचा देखील समावेश असणार आहे. गेली ६५ वर्षे दिमाखात उभी असलेल्या सरस्वती मंदिर ट्रस्टच्या इमारतीला दि. ७ - ८ एप्रिल २०१८ रोजी सर्व सरस्वतीयांनी भावपूर्ण निरोप दिला होता. ५ मे रोजी शाळेच्या मोकळ्या मैदानात नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला होता. गेल्या सहा महिन्यात अनेक अडचणींवर मात करून नूतन इमारतीच्या पायाचे काम पूर्ण झाले असून, ठा.म.पा. च्या परवानगीने प्रत्यक्ष इमारत बांधणीचे काम जोमाने सुरु झाले आहे. तळमजला आणि वर सहा मजले असलेली ही इमारत नजीकच्या काळात उभी राहील असा विश्वास आम्हाला आहे. जून १९१९ पासून सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाचे सर्व वर्ग नूतन इमारतीत सुरु होतील. हे वर्ग आधुनिक शैक्षणिक आणि भौतिक सोयी, सुविधायुक्त सुरु करण्याचा मानस सरस्वती मंदिर ट्रस्टचा आहे. ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट’ कै. विमलाबाई कर्वे यांच्या आकांक्षा आणि प्रेरणेतून जन्मलेली संस्था. कर्वे बाईनी हे रोप प्रेमाने जोपासले आणि वाढवले. टिळक सरांनी ते आपल्या कर्तृत्वाने फुलवले. गेल्या पासष्ठ वर्षात शैक्षणिक, विज्ञान संशोधन आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी धवल यश प्राप्त केले आहे. १९९८ सालापासून कार्यरत असलेल्या सरस्वती क्रीडा संकुलातील शेकडो खेळाडूंनी, जिम्नस्टिक, बास्केटबॉल, टेबल टेनिस, ज्युडो या खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पराक्रम गाजविले आहेत. संस्थेतील खेळाडू आणि शिक्षक सहा शिवछत्रपती पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत.५२,००० चौरस फूट क्षेत्रफळ असणाऱ्या सहा मजली इमारतीत, पूर्व प्राथमिक ते दहावी पर्यंतच्या जुन्या इमारतीतील सर्व वर्गांचा समावेश होणार आहे. या बरोबर पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाला स्वत;चे कौशल्यकक्ष, आणि ग्रंथालय असणार आहे. गेली तीन वर्षे संस्थेचे ‘ पूर्व प्राथमिक ते प्राथमिक विभाग मुलांचे संक्रमण सुकर होण्यासाठी - पाल्य मूल्यमापन; पालक व शिक्षक समन्वय.’ या विषयावरील प्रकल्प राबवीत आहेत. या प्रकल्पाला राष्ट्रीय शिक्षण संशोधन संस्थेच्या [NCERT] वतीने २०१६ साली राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला होता. हा प्रकल्प आता प्रत्यक्षात कार्यरत होत आहे. या मुलांना कौशल्यशिक्षण आणि स्वानुभवातून शिक्षण मिळण्यासाठी विशेष कक्ष नूतन इमारतीत उपलब्ध असणार आहेत. माध्यमिक विभागाला स्वतंत्र प्रयोगशाळा, अद्यावत ग्रंथालय आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचा सराव करण्यासाठी खास वर्ग असणार आहे. संपूर्ण शाळा डिजिटल शैक्षणिक सुविधांनी सुसज्ज करण्याची भावी योजना आहे. मराठी शाळेच्या नूतन वास्तूचा एकंदरीत खर्च रु. १५ कोटी आहे. या विद्या संकुलात फक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा निर्धार आहे. कोणत्याही परिस्थतीत सरस्वती विद्या संकुलात बाजारू अथवा निव्वळ व्यावसायिक आस्थापना असणार नाही. यामुळे १५ कोटी रक्कम उभी करणे हे संस्थेसमोर मोठे आव्हान आहे. शाळेचे माजी शिक्षक आणि विद्यार्थी, इमारत निधी जमविण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत .शाळेचे वर्तमान शिक्षक आणि पालकसुद्धा मदतीचा हात पुढे करीत आहेत. या सर्वांच्या सहकार्याने हे प्रचंड रकमेचे शिवधनुष्य संस्था लीलया उचलेल असा मला विश्वास आहे, कारण मागील शतकात कर्वे बाईनी ते करून दाखवलेले आहे. ही नूतन इमारत जुने आचार, विचार, संस्कार मूल्ये आणि नव उन्मेष, उमंग आणि ऊर्जा यांचा सेतू असणार आहे. मागील काळातील उज्ज्वल इतिहास बरोबर घेऊन भविष्यातील शैक्षणिक गरजांचा आणि गुणवत्तेचा वेध ही नूतन वास्तू घेणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम संस्थेचे आजी - माजी शिक्षक, विद्यार्थी, पालक ,हितचिंतक आणि परिसरातील नागरिक यांच्या मनो मीलनासाठी आयोजित केले आहेत. या सर्व घटकांनी वरील दोन्ही कार्यक्रमास बहु- संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेने केले आहे. प्रस्तुत दोन्ही उपक्रमांची नोंदणी चालू आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात अथवा खालील संकेत स्थळाला भेट द्यावी असे आवाहन केले आहे.
नोंदणी.; http://bit.ly/2q1FBO0
Web : saraswatimandirtrust.com
Email: saraswatimandirtrustthane@gmail.com
FB: Saraswati Mandir Trust
FB Page: Run4Saraswati एक धाव शाळेसाठी
दूरध्वनी - ०२२- २५४०१२३० , मोबाईल- ९८२०१३७५७६