ठाणे : उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाचे सेतू कार्यालय मागील दीड ते दाेन वर्षांपासून बंद आहे. ते सुरू करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून काेणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नाही. त्यामुळे विविध स्वरूपाच्या दाखल्यांसाठी खासगी सायबरकॅफे चालक गाेरगरीब गरजूंकडून ५०० रुपयांपर्यंतची रक्कम मनमानी पद्धतीने वसूल करीत आहेत. प्रशासनाच्या बेफिकिरीबद्दल उल्हासनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त करून नागरिक आंदाेलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
सध्या शालेय व महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. त्यांना शैक्षणिक कामासह विविध सरकारी कामांसाठी लागणारे दाखले, प्रमाणपत्र सेतू कार्यालयातून माफक शुल्कात मिळणे अपेक्षित आहे; पण सेतू कार्यालय दीड ते दाेन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे ३५ ते ७० रुपयांत मिळणारे दाखले खासगी सायबरकॅफेतून ५०० रुपये व त्यापेक्षाही अधिक शुल्क मनमानी पद्धतीने आकारून दाखले दिले जातात. आठ ते दहा दिवसांमध्ये दाखला मिळत नाही. या मनमानी व प्रशासनाच्या निष्काळजीपणा विराेधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संघटना तीव्र आंदाेलन छेडून तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाचा, जातीचा, नाॅनक्रिमिलिअर, डाेमीसाइल, रहिवासी असल्याचा आदी विविध दाखल्याची गरज आहे. याशिवाय गरीब, हाेतकरू सुशिक्षित बेराेजगारांना विविध याेजनांचा लाभ घेण्यासाठी दाखल्यांची गरज आहे. निराधार महिला, व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आदींना तहसीलदारांच्या स्वाक्षरीच्या दाखल्यांची गरज आहे.