मीरा रोड : आॅर्केस्ट्रा, डान्स बारचा परवाना नसताना मीरा रोडच्या गंधर्व बारवर मध्यरात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ७ बारबाला सापडल्या. विशेष म्हणजे धाड पडताच बारबाला बारच्या भिंतीला पाडण्यात आलेल्या भगदाडातून मागील बाजूस असलेल्या इमारतीत लपत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रहिवाशांनी गेल्याच वर्षी असल्या प्रकाराबाबत पालिका व पोलिसांना लेखी तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.मीरा रोडच्या मुख्य मार्गावर लीना हाइट्स इमारतीच्या समोर गंधर्व बार आहे. पोलिसांनी व जिल्हाधिकारी कार्यालयाने मुसक्या आवळल्याने आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणारे गैरप्रकार बंद झाले आहेत, असे वाटत होते. पण, आॅर्केस्ट्रा व डान्स बारचा परवाना नसतानाही गंधर्व बारमध्ये चक्क ७ बारबाला पोलिसांना सापडल्या.शुक्रवारी व शनिवारच्या मध्यरात्री नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहायक निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गंधर्व बारवर धाड टाकली. या बारमध्ये बनवलेल्या एका गुप्त खोलीत दोन बारबाला लपलेल्या होत्या. बारच्या मागील भिंतीला पडलेल्या भगदाडातून लीना हाइट्स इमारतीच्या आवारात लपून बसलेल्या ५ बारबाला पोलिसांना सापडल्या.नयानगर पोलिसांनी याप्रकरणी ७ बारबालांसह बारचा व्यवस्थापक, वेटर आदी ७ ते ८ कर्मचारी तसेच बारमध्ये बसलेल्या ५ ते ६ ग्राहकांवर कारवाई केली.तर, बारमध्ये असलेल्या गुप्त खोलीवर तसेच अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई करण्यास केलेली टाळाटाळदेखील समोर आली आहे. लीना हाइट्स इमारतीच्या सीसीटीव्हीमध्येही बारबाला भिंतीतील भगदाडातून बाहेर पडून इमारतीच्या आवारात लपून बसल्याचे दिसून आले आहे.रहिवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्षगंधर्व बारमुळे येथील रहिवासी त्रासले असून गेल्या वर्षी जानेवारीमध्येही असाच काहीसा प्रकार समोर आला होता. त्या वेळी रहिवाशांनी मीरा-भार्इंदर महापालिका व नयानगर पोलीस ठाण्यास पत्र देऊन गंधर्व बारवर कारवाईची मागणी केली होती.यामध्ये बारचालकाने बारच्या मागील भिंतीला भगदाड पाडून इलेक्ट्रॉनिक दार लावल्याचे तसेच पोलिसांची धाड पडली की, बारबाला त्यातून आमच्या इमारतीच्या आवारात शिरून लपतात, असे कळवले होते. मात्र, या तक्रारींकडे पालिकेसह पोलिसांनी दुर्लक्ष केले.
सात बारबाला सापडल्या, बारमध्ये होते भिंतीत लपण्यासाठी भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:56 PM