कल्याण : बीएआरसीमध्ये नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवत सात जणांकडून १७ लाख ५३ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अमृत मंडले आणि रवी चव्हाण (दोघे रा. ठाणे) यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.२०१४ मध्ये महादेव सनाम (५६, रा. रामबाग, कल्याण) यांची एका मित्रामुळे अमृत याच्याशी ओळख झाली. यावेळी बीएआरसीमध्ये नोकरी करत असून, तेथे रिक्त जागेवर तुमच्या मुलाला कामाला लावू शकतो, असे अमृतने महादेव यांना सांगितले. ही बाब महादेव यांनी त्यांचा मामेभाऊ अंकुश तावडे (रा. सिंधुदुर्ग) याला सांगितली. त्यानंतर, अमृतची भेट घेणाऱ्या अंकुशला सहा महिन्यांत बीएआरसीत क्लार्कची नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी अंकुशकडून एक लाख रुपये रोख घेतले. तसेच, महादेव यांचा पुतण्या बाबाजी याच्याकडूनही अंकुशने ७५ हजार रुपये घेतले. परंतु, दोघांनाही सहा महिन्यांत नोकरी न लागल्याने २०१५ मध्ये अमृतकडून पैसे परत घेतले.पैसे परत केल्याने महादेव यांचा अमृतवरील विश्वास वाढला. त्यानंतर, जुलै २०१६ मध्ये बीएआरसीमध्ये क्लार्क म्हणून कामाला लावण्यासाठी बाबाजीने अमृतला अडीच लाख रुपये दिले. त्यावेळी, अमृतसोबत असलेल्या रवी चव्हाणची बीएआरसीमध्ये क्लार्क म्हणून कामाला असल्याची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर, नोकरी लागत नसल्याने महादेव यांनी पैशांसाठी तगादा लावला असता, अमृतने ४५ हजार रुपये परत केले. २०१८ पर्यंत बीएआरसीमध्ये जागा निघणार असून तेव्हा काम करून देण्याचे आश्वासन अमृतने दिले. याच दरम्यान, बाबाजीला लेखी परीक्षेसाठी बीएआरसीमधून लेखी परीक्षेसाठी कॉल आला. त्यामुळे एक लाख रुपयांची मागणी करणाºया अमृतच्या खात्यावर महादेव यांनी ४८ हजार रुपये पाठवले. बीएआरसीमध्ये बाबाजीने वाहनचालकपदासाठी परीक्षा दिली. मात्र, त्यात तो नापास झाला.त्यानंतर, २०१८ मध्ये बाबाजीने क्लार्कची परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण होऊनही लिस्टमध्ये नाव न आल्याने महादेव यांनी अमृतशी संपर्क साधला. त्यावेळी त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. २०१९ मध्ये अमृत कुठेतरी निघून गेल्याचे महादेव यांच्या निदर्शनास आले.याप्रकरणी महादेव यांच्या तक्रारीवरून अमृत आणि रवी यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.यांच्याकडूनही उकळले पैसेत्याचबरोबर अनिकेत अधिकारी यांच्या आईकडून तीन लाख, विजय वाघ (दोघेही रा. रामबाग, कल्याण) यांच्याकडून चार लाख, सिद्धेश परब (रा. विरार) यांच्याकडून तीन लाख, तुलसीराम कटके (रा. कल्याण) यांच्याकडून साडेतीन लाख, हितेश केणी यांच्याकडून दीड लाख रुपये बीएआरसीमध्ये नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवत अमृत आणि रवीने घेतले.
बीएआरसीत नोकरीच्या प्रलोभनाने, सात जणांना गंडा, दुकलीविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:26 AM