लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईतील अनेक पोलीस अधिकाºयांशी सौख्याचे संबंध असल्यामुळे महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मी सहज उत्तीर्ण करून देऊ शकतो, अशी बतावणी करून ठाण्यातील एका तरुणाची सात लाख ८० हजारांची फसवणूक करणा-या अर्जुनकुमार राठोड (रा. पिंपळगाव, जि. यवतमाळ) याला नौपाडा पोलिसांनी यवतमाळ येथून सोमवारी रात्री अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मंगळवारी दिले.कळव्याच्या हरपितसिंग चिमा (३०) याने पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस अधिकारी होण्यासाठी ठाण्यातील ‘क्लाईम्ब फस्ट’ या स्पर्धा परीक्षांसाठी असलेल्या खासगी क्लासमध्ये दहा हजार रुपये (तीन महिन्यांसाठी) भरुन २०१२ मध्ये प्रवेश घेतला होता. शिकवलेले काहीच लक्षात येत नसल्यामुळे त्याने क्लासचे अर्जुनकुमार राठोड या शिक्षकांशी सपर्क साधला. सुरुवातीला राठोडनेच त्याला चांगल्या प्रकारे शिकविण्यास सुरुवात करून घरगुती शिकवणी घेण्याचीही तयारी दर्शविली. त्यामुळे हरपितसिंग याच्यासह त्याचे मित्र बजरंग चौगुले, मन्नु टी आणि मयूर शेळके यांनी आॅक्टोबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ दरम्यान राठोडच्या बदलापुरातील ‘मॅरेथॉन सिटी’ येथील घरी क्लासला सुरुवात केली. कालांतराने दोन महिन्यांनी अचानक क्लास बंद झाला. पुढे एप्रिल २०१३ मध्ये राठोडने ठाण्याच्या पॅराडाईज टॉवर येथील दुसºया माळयावर ‘तांडा पब्लिकेशन अॅकेडमी’ नावाने क्लास सुरू केला. तिथे हरपितसिंग आणि त्याच्या मित्रांनी आठ महिन्यांच्या या क्लाससाठी ७५ हजार रुपये रोखीने भरून प्रवेश घेतला. त्याचवेळी राठोडने मुंबईतील अनेक पोलीस उपायुक्त आपले भाऊबंद आहेत. त्यांच्याकडून मी तुम्हाला एमपीएससी परीक्षा पास करून देतो, अशी बतावणी केली. त्याबदल्यात हरपितसिंग याच्याकडून जून २०१३ मध्ये एक लाख रुपये त्यापाठोपाठ २६ जुलै २०१३ रोजी ५० हजार रुपये, सप्टेंबर २०१३ आणि आॅक्टोबर २०१३ मध्ये अनुक्रमे दोन लाख आणि ५५ हजार रुपये असे सात लाख ८० हजार रुपये उकळले. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये मात्र राठोडने हा क्लासही बंद केला. पुढे अनेकदा तो पुढच्या महिन्यात तुझे काम नक्की करतो, असे सांगून तो हरपितसिंगला टोलवाटोलवी करीत होता. जानेवारी २०१६ नंतर त्याने फोनसह सर्व प्रकारचा संपर्क तोडला. वारंवार पाठपुरावा करूनही राठोडने पैसे किंवा नोकरीलाही न लावल्याने याप्रकरणी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी हरपितसिंगने राठोडविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.अनेकांची फसवणूक केल्याची शक्यतावरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर, पोलीस नाईक शब्बीर फरास आणि योगेश चव्हाण यांच्या पथकाने राठोडला अखेर यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव येथून ४ डिसेंबर रोजी अटक केली. त्याने आणखी अनेक जणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
उत्तीर्ण करण्याच्या नावाखाली सात लाखांची फसवणूक, भामट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 6:04 AM