राजू काळे / ऑनलाइन लोकमत
भार्इंदर, दि.19 - जागतिक स्तरावरील भारतात मधुमेह (डायबेटीज)आजाराची वाढती व्याप्ती सध्या चिंतेचा विषय होत चालला आहे. इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनच्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे साडेसहा कोटी मधुमेहाचे रुग्ण असून पुढील १० वर्षांमध्ये त्यात१०० टक्यांची वाढ होऊन हा आकडा १२ कोटी होण्याची भिती व्यक्त करण्यात आल्याची माहिती मधुमेह तज्ञ डॉ. बेहराम परडीवाला यांनी दिली आहे.
मधुमेहामुळे अनेक गुंतागुंतीचे विकार होऊ शकतात. यात हृदयविकार, पॅरालिसीस, किडनीचे विकार होण्याचे संभव असतात. यातील सर्वात धोकादायक विकार म्हणजे डायबेटीक फूट. डायबेटिक फुट म्हणजे वेदनांची जाणीव न होणारा पाय, यात पायाला जखम होऊन तो पाय गँगरीनमुळे कापावा लागतो. एकट्या अमेरिकेमध्ये दरवर्षी डायबेटीक फूटमुळे एक लाख पाय कापले जातात. भारतात मात्र त्याच्या तीन पट लोकांना डायबेटीक फूटचा विकार जडतो. त्यामुळे भारताला जागतिक स्तरावर डायबेटीकची राजधानी म्हणुन ओळखले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने भारतामध्ये डायबेटीक फूटच्या आजाराने तीन लाखाहून अधिक लोकांना पाय गमवावे लागत आहेत. परंतु भारतातील डायबेटीक पेशंटची संख्या बघता हा आकडा १० लाखाच्या वर असण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे. सध्या डायबेटीक फूटच्या आजारावर स्टेम सेल थेरपीचा पर्याय समोर येत असून यामुळे मधुमेह असणाय््राा रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा प्रयोग एका ६० वर्षीय मधुमेही रुग्णावर करण्यात आल्याने त्याचा पाय वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याचे डॉ. परडीवाला यांनी सांगितले आहे. अधिक माहिती देताना त्यांनी, मधुमेहामुळे पायात रक्तप्रवाह कमी झाल्याने पायाच्या संवेदना कमी होऊन पायाला जखमा होतात. सहसा पायाच्या छोट्या जखमांकडे दुर्लक्ष करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु, मधुमेही रुग्णांच्या बाबतीत या जखमा चिघळण्याने पायाला गँगरीन होण्याची शक्यता असते. गँगरीनचे प्रमाण वाढल्यास पाय कापावा लागतो. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आलेल्या या पेशंटला ही पाय कापण्याचा सल्ला मिळाला होता. त्यावेळी त्या रुग्णाच्या अस्थिमज्जामधील (बोनमैरो) स्टेम सेल थेरपीचा पर्याय वापरल्यामुळे त्याचा पाय शाबुत राहिला. त्यामुळे असाध्य आजारामधील स्टेम सेल उपचार पध्दत सध्याच्या काळात सर्वात चांगली उपचार पध्दती ठरत आहे. जगात जवळपास ७५ पेक्षा अधिक जीवघेण्या आजारांमध्ये स्टेम सेल उपयुक्त ठरल्याचे सिध्द झाल्याचे सांगितले.