भिवंडी : भिवंडी मनपाच्या इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाचे शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर ४१ कर्मचाऱ्यांचे समावेशन रखडले होते. त्यांच्या पगाराबाबत मनपा महासभेने घेतलेला ठराव शासनाने विखंडित केला असून सात महिन्यांचा पगार मनपाने दोन महिन्यांत द्यावा, असे आदेश शासनाचे उपसचिव श्रीराम यादव यांनी दिले आहेत.महानगरपालिकेचे इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय नोव्हेंबर २००९ मध्ये शासनाकडे सोपविल्यानंतर त्यामध्ये काम करणाऱ्या ४१ मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याचा विषय शासनाकडे प्रलंबित होता. दरम्यानच्या काळात सदर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते मनपा देत होती. मात्र, तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही कर्मचाऱ्यांचे समावेशन न झाल्याने तसेच पालिकेची स्थिती डबघाईला आल्याने आॅक्टोेबर २०१४ नंतर या कर्मचाऱ्यांचे कोणतेही वेतन व भत्ते मनपा देणार नाही, असा ठराव महासभेने केला. परिणामी, ४१ कर्मचाऱ्यांचे वेतन पालिकेने अदा केले नाही. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत ३० जानेवारी २०१५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे समावेशन झाले.तोपर्यंत हे कर्मचारी मनपाचे आहेत, असे नमूद करून भिवंडी मनपाने कर्मचाऱ्यांबाबत केलेला ठराव लोकहिताविरोधात असल्याने सदर ठराव शासनाने विखंडित केला. तसेच या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व भत्त्याच्या रकमा दोन महिन्यांत त्यांना देण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत. (प्रतिनिधी)
सात महिन्याचा पगार दोन महिन्यात
By admin | Published: August 05, 2015 12:31 AM