अनिकेत घमंडी। लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिवहनच्या ताफ्यात ४७ बस दाखल झाल्या आहेत. या बसपैकी सात बस १५ दिवसांत टप्प्याटप्प्याने रस्त्यावर धावू लागतील, अशी माहिती परिवहन सभापती संजय पावशे यांनी ‘लोकमत’ला दिली.केडीएमटीच्या ताफ्यात आलेल्या या बस सध्या जागेअभावी कल्याणच्या मेट्रोजंक्शन मॉलमध्ये उभ्या केल्या आहेत. ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्वावर त्या रस्त्यांवर धावू लागतील. अधिक मागणी असलेल्या तसेच नवीन मार्गांवर या बस सुरू केल्या जातील. नव्या बस रस्त्यावर आणताना कोणत्याही जुन्या बसचे मार्ग बंद केले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जुन्या बसची तांत्रिक कामे तातडीने केली आहेत. त्यामुळे एकही बस बंद न ठेवण्याच्या सूचना परिवहन व्यवस्थापनाला दिल्याचे ते म्हणाले. केडीएमसीच्या ताफ्यात लवकरच उर्वरित ४० बसही दाखल होतील. त्या आल्यावर आवश्यक ते बदल करून त्या देखिल रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे पावशे म्हणाले. केडीएमटीची सेवा विविध मार्गांवर सुरू करण्याची मागणी होत आहे. नव्या मार्गांवर सुरुवातीला एक बस सोडण्यात येईल. त्याला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद बघून फेऱ्या वाढवण्याबाबत विचार केला जाईल, असे ते म्हणाले.डोंबिवलीतील बस खंबाळपाडा आगारात उभ्या करण्यासदंर्भातही प्रशासन सकारात्मक आहे. खंबाळपाडा आगारातून बस सुटल्यास लागणारे इंधन व वेळ वाचेल. त्यामुळे परिवहनच्या तिजोरीत बचत होईल. पण हे कागदोपत्री मान्य असले तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही, अशी पावशे यांनी नाराजी आहे.
सात बस १५ दिवसांत धावणार
By admin | Published: June 19, 2017 3:46 AM