ठाणे : पश्चिम बंगाल येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ देशभरातील सर्व खाजगी डॉक्टरांनी सोमवारी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंदमध्ये ठाण्यातील डॉक्टरही त्यात सामील झाले होते. त्यावेळी हल्लेखोरांना सात वर्षे शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी केली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली येथील डॉक्टरांनी ठाणे शासकीय विश्राम गृहाजवळ निदर्शने केली. यावेळी सर्व खाजगी डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता दिवसभर आपले क्लिनिक बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या नेतृत्त्वाखाली स्थानिक डॉक्टरनी सोमवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले. यावेळी डॉक्टरांनी जोरदार निदर्शने केली. यात ठाणे शहरातील महिला व पुरुष डॉक्टर मोठ्या संख्येने सामील झाले होते. याबाबत बोलताना ठाणे शाखेचे अध्यक्ष दिनकर देसाई म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर तो हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केले आहे.महाराष्ट्र सरकारने २०१० साली डॉक्टर संरक्षण कायदा मंजूर केला. परंतु, त्याची प्रभावी अमंलबजावणी योग्य रितीने होत नाही. मुळात आजतागायत या कायद्याअंतर्गत कोणालाही शिक्षाच झाली नाही. त्यातही यात केवळ तीन वर्षांची शिक्षेची तरतूद असल्याने त्याचा धाक राहिला नाही . परिणामी ही शिक्षा सात वर्षे इतकी करावी. राज्य सरकारने डॉक्टरांना पूर्णपणे संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज हे आंदोलन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.
हल्ला करणाऱ्यांना सात वर्षे शिक्षा हवी; डॉक्टरांच्या संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:11 AM