ठाणे - ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आगमनापूर्वीच श्री गणराया पावला आहे. या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सप्टेंबर २०२२ च्या वेतनात लागू झाला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार ठाणे महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन २९ ऑगस्ट २०२२ रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. या वेतनात सातवा वेतन आयोग मिळाल्यामुळे ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार मानले आहेत.
ठाणेकर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार हाती घेताच ही आनंदाची बातमी ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळाली. माजी महापौर नरेश म्हस्के यांनीही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सातवा वेतन आयोग सप्टेंबर २०२२ च्या वेतनात मिळाल्यामुळे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या वेतनात चांगली वाढ झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग स्वीकृती करण्यासाठी संमती दिली, अशा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. तर ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या काही पदांच्या वेतनश्रेणी या शासनाकडे असलेल्या वेतनश्रेणीशी समकक्ष आढळून न आल्याने या पदांबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. शासनाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी म्हटले केले.
सातव्या वेतन आयोगानुसार ठाणे महापालिकेतील वर्ग दोन ते चारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आठ ते २७ हजारांपर्यत वाढ झाली आहे. २०१६ पूर्वी सेवेत लागलेल्या कनिष्ठ अभियंता यांच्या वेतनात १८ ते २२ हजार, उपअभियंता यांच्या वेतनात २७ हजार, मुकादम यांच्या वेतनात १० ते १४ हजार, मॅकॅनिक यांच्या वेतनात ९ ते दहा हजार ५०० पर्यंत, लिपिक यांच्या वेतनात नऊ ते दहा हजार, जलनिर्देशक यांच्या वेतनात १२ ते १४ हजार, वाहनचालक यांच्या वेतनात नऊ ते दहा हजार, सफाई कर्मचारी यांच्या वेतनात आठ ते दहा हजार, शिपाई यांच्या वेतनात सहा ते सात हजार ७०० तर २०१६ पूर्वी लागलेल्या आरक्षकांच्या वेतनात १५ हजार ८८६ तर २०१६ नंतर लागलेल्या कनिष्ठ अभियंता यांच्या वेतनात १२ ते १५ हजारांची वाढ झाली आहे