सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका कर्मचाऱ्यांचा गुरवारी सातवा वेतन आयोगा नुसार पगार झाल्याने, कामगारांनी आनंद व्यक्त केला. महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव व आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठविल्याने त्यांचा जाहीर सत्कार करण्याचे संकेत कामगार नेते चरणसिंग टाक यांनी दिले.
उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या आदेशनव्हे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार संघटनेने सतत पाठपुरावा केला. तसेच काळ्या फित लावून काम करणे, कामबंद आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले. विविध कामगार संघटनेने कामगार कृती समितीची स्थापना करून कामगारांची आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना एकजूट दाखविली. गेल्या महिन्यात आयुक्तांनी जानेवारीचे वेतन फेब्रुवारी महिन्यात सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरवारी कामगारांचा सातवा वेतन आयोग प्रमाणे वेतन काढले. सातवा वेतन आयोग प्रमाणे वाढीव पगार हाती पडताच कामगारांनी आनंद व्यक्त केला. मुलांचे शिक्षण, लग्न, घराचे कर्ज भाडे आदी कामे वेळेत करता येणार असल्याची प्रतिक्रिया कामगारांनी दिली.
महापालिका कामगार नेते चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे, दिलीप थोरात, दीपक दाबने आदींनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महापौर, उपमहापौर, आयुक्त, सभागृनेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती सभापती आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका वठविल्याने, त्यांचा येणाऱ्या सोमवारी कामगारांच्या वतीने जाहीर सत्कार करणार असल्याचे मत व्यक्त केले.
महापालिकेवर दीड कोटींचा भुर्दंड
महापालिकेने सातवा वेतन आयोग लागू केल्याने, आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर दरमहा दीड कोटीचा भुदंड पडणार आहे. महापालिकेने आपल्या जुन्याच उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केल्यास महापालिकेला मोठे उत्पन्न मिळण्याची शक्यता कामगार नेते दिलीप थोरात यांनी व्यक्त केली.