उल्हासनगर : पूर्वेतील कोरोना रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने त्यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात धाव घेऊन संतापाला मोकळी वाट करून दिली. यावेळी या कर्मचाºयांनी महापालिका आयुक्त समीर उन्हाळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट न झाल्याने त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी माझ्याकडे हा विषय येत नसल्याचे सांगत उपायुक्त मदन सोंडे यांच्याकडे बोट दाखविले. त्यानंतर, या कर्मचाºयांनी पत्रकारांची भेट घेऊन असुविधेबाबत माहिती दिली. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो, तिथे गरम पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. तर, रुग्णालयात निकृष्ट जेवण दिले जात असून मृतदेहांची बांधणी, रुग्णांना जेवण देणे आदी कामे करावी लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कोरोना रुग्णालयातील कर्मचाºयांनी असुविधेबाबत पाढा वाचल्याने आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. याबाबत उन्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल बंद होता. तर, डॉ. मोहनाळकर म्हणाले की, जेवणाची व्यवस्था एक सहायक आयुक्त दर्जाचा अधिकारी पाहतो. हॉटेलची दुरुस्ती सुरू असल्याने या कर्मचाºयांना १५ दिवस हॉटेलमध्ये ठेवा. आम्ही पर्यायी व्यवस्था करतो, असे पत्र पालिकेने हॉटेलचालकाला दिले आहे. रुग्णालयातील व्यवस्था रुग्णालय अधीक्षक बघत असल्याने, त्याबाबतची माहिती घेतो, असे ते म्हणाले.