टोकावडे : तालुक्यातील खेडोपाडी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी या पंचायत समिती कार्यालयावर आहे. मात्र, याच कार्यालयाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून पंचायत समितीच्या सर्वच विभागांत पाणी मिळत नसल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांत संताप आहे. मुरबाड पंचायत समिती अंतर्गत पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, सामान्य विभाग येतात. बाजूला पोलीस ठाणे, तहसीलदार विभाग आहेत. या सर्वच विभागांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पंचायत समितीकडे आहे. मात्र, एमआयडीसीने पाणीकपात केल्याने या सर्वच कार्यालयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शिवाय, मुरबाड ग्रामीण रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभागातही पाणीकपात केल्याने नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयाची देखरेख धात्रक या शाखा अभियंत्याकडे आहे. त्यांच्याकडून येथे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.स्वत:च्या कार्यालयातील पाणीटंचाई ज्यांना दूर करता येत नाही, ते अधिकारी आणि कर्मचारी तालुक्याची पाणीटंचाई काय दूर करणार? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जातो आहे.
मुरबाड पंचायत समितीत भीषण पाणीटंचाई
By admin | Published: June 08, 2015 11:19 PM