डोंबिवली : एमआयडीसीतील ३५ ते ५० वर्षांपूर्वीच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जीर्णावस्थेत आहेत. देखभाल व दुरुस्ती करण्यालायकही त्या राहिल्या नसल्याने सध्या ड्रेनेज चेंबर तुडुंब भरून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र येथील औद्योगिक आणि रहिवासी क्षेत्रांत पाहायला मिळत आहे.
प्रदूषणाची समस्या अधूनमधून डोके वर काढत असताना आता सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जीर्णावस्थेतील वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. १९६४ ला या ठिकाणी एमआयडीसी आल्यावर येथील उद्योगांसाठी रासायनिक व इतर सांडपाणी वाहून नेण्यासाठी ७०च्या दशकात सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली; तर निवासी भागात सांडपाणी वाहिन्या १९८५ ला टाकण्यात आल्या. वाहिन्यांची एकूण लांबी कमीत कमी अंदाजे ३१ कि.मी. आहे. १५० ते ८०० व्यासाच्या जाडीचे सिमेंट पाइप त्यावेळी टाकण्यात आले होते. कालांतराने विविध कारणांमुळे या वाहिन्या व त्यांवरील चेंबर नादुरुस्त होत गेले. सांडपाणी वाहिन्यांना आजच्या घडीला बऱ्याच वर्षांचा काळ लोटला आहे. त्याची देखभाल व दुरुस्तीही आता शक्य नाही. या वाहिन्यांना रस्तेदुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या टाकण्यासाठी तसेच अन्य प्राधिकरणांनी केबल टाकण्याकामी केलेल्या खोदकामांमुळे धक्के बसून त्या नादुरुस्त झाल्या आहेत. वृक्षांची खोलवर गेलेले खोड, मुळे वाहिन्यांमध्ये शिरून त्या खराब झाल्या आहेत. यात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या आणि त्यांचे चेंबर फुटलेले आढळून येत असून त्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
------------------------------------------------------
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे
सांडपाण्याच्या जीर्ण झालेल्या वाहिन्यांमुळे रासायनिक प्रदूषण, दुर्गंधी, आरोग्य, पर्यावरण, आदी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील प्रदूषण कमी झाल्याचे विविध प्रयोग आणि दावे केले जात आहेत. प्रत्यक्षात काहीही फरक पडलेला नाही. एमआयडीसीकडून जुन्या वाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकण्याचे प्राथमिक स्तरावर कागदावर नियोजन चालू आहे. या कामासाठी प्रस्ताव पाठविला तरी त्यानंतर मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळणे, निविदा काढणे, आदी कामांसाठी काही महिने जातील. त्यानंतर हे मोठे काम पूर्णत्वास येण्यास अजून काही वर्षे जातील. आरोग्य, प्रदूषण यांविषयी असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नांत हे काम लवकर कसे मार्गी लागेल यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे ही विनंती.
- राजू नलावडे, रहिवासी, एमआयडीसी निवासी विभाग
------------------------------------------------------
फोटो आहे