ठाणे : सध्या पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आराेग्यासह स्थानिक प्रशासन सक्रीय झाले आहे. पण अंबरनाथ नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील पनवेलकर ट्वीन टाॅवर ते विश्वजीत मिडाेज या उच्चभ्र लाेकवस्तीच्या परिसरात गटारांमधील घाणीचे सांडणाी रस्त्यावर येऊन साथीच्या आजारांना निमंत्रण देत आहे. आराेग्यास घातक असलेलया या समस्येकडे येथील रहिवाश्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र अजूनही त्याकडे प्रशासनाकडून गांभीयाने लक्ष दिले जात नसलयामुळे रहिवाश्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अंबरनाथ पूर्वच्या पनवेलकर ट्विन टॉवर ते विश्वजीत मिडोज, मोरीवली पाडा, येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी, सांडपाणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाहत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान या रस्त्याचे कॉक्रिटिकरण करण्यात आले तेव्हा केवळ एका बाजूने भूमिगत गटार करण्यात आले. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूमिगत गटार करण्याबाबत रहिवाशांनी विनंती केली असतानाही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता या उच्चभ्रू लाेकवस्तीच्या गृहसंकुलादरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी, सांडपाणी रस्त्यावर वाहत असून साचत आहे. पावसादरम्यान गुडघाभर पाण्यातून येजा करण्याचा प्रसंग या रहिवाश्यांकडून ऐकवला जात आहे.
निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी!
गटारीचे सतत वाहणाऱ्या घाण पाण्यामुळे रस्त्यावर शेवाळ झाले आहे. त्यावरून शाळेत जाणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर मात करण्यासाठी पनवेलकर ट्विन टॉवर ते विश्वजीत मिडोज, मोरीवली पाडा, अंबरनाथ पूर्व या रस्त्यावरील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची कारवाई तात्काळ करण्याची मागणी जाेर धरत आहे. सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्यास संभाव्या अपघात, जिवितहानीस अंबरनाथ नगरपरिषद जबाबदार राहील. या घाणीच्या सांडपाण्याच्या त्रासास कंटाळून आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या तयारी परिसरातील नागरीक करीत आहेत, असा इशाराही नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात करण्यात आलेला आहे.