सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील सांडपाणी प्रक्रिया विना थेट वालधुनी नदीत सोडले जात असल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. खेमानी नाल्यातील सांडपाणी पंपिंगद्वारे उचलून अंबिकानागर नाल्याद्वारे वालधुनी नदी पात्रात सोडले जाते. अमृत योजने अंतर्गत कोट्यवधी निधीतून उभारलेले मलशुद्धीकरण केंद्र अद्यापही कार्यान्वित झाले नसल्याने, त्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
उल्हासनगरातील सांडपाण्यावर यापूर्वी शांतीनगर व खडगोलवली मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून, पाणी वालधुनी नदीत सोडले जात होते. मात्र महापुरात खडगोलवली व शांतीनगर येथील शुद्धीकरण केंद्राचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन सांडपाणी वाहून आणणारे बहुतांश पाईप वाहून गेले. काही अपवाद सोडल्यास दोन्ही केंद्र तेंव्हापासून बंद पडली. दरम्यान वालधुनी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकल्यावर, वालधुनी नदीला प्रदूषित करणाऱ्या शहरातील ५०० पेक्षा जास्त जीन्स कारखान्यावर प्रदूषण मंडळाने कारवाई केली. त्यानंतरही नदीचे प्रदूषण थांबले नसून नदी पात्रात सांडपाणी सोडणाऱ्या अंबरनाथ येथील रासायनिक कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरातील सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडले जात असल्याने, सर्व स्तरातून टीका झाली. अखेर केंद्राच्या अमृत योजने अंतर्गत वडोलगाव, शांतीनगर व खडगोलवली येथे मलजल शुद्धीकरण केंद्र उभे करण्यास मंजुरी मिळून सांडपाण्याचे मुख्य पाईप नव्याने टाकण्यात आले. वडोलगाव येथे उभारण्यात आलेल्या मलजल शुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन, गेल्या महिन्यात केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी दिली. तर शांतीनगर येथील मलजल शुद्धीकरण केंद्र मार्च मध्ये कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले. उल्हास नदीला प्रदूषित करणाऱ्या खेमानी नाल्यातील ४ एमएलडी सांडपाणी पंपिंगद्वारे उचलून अंबिकानगर सोडण्यात येते. नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शांतीनगर येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असून तेही दोन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. तर खडगोलवली येथील केंद्राचे काम सुरवात होणार असल्याची माहिती रहेजा यांनी दिली.
वालधुनी व उल्हासनदी प्रदूषित
उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न होता थेट सांडपाणी दोन्ही नदी पात्रात व उल्हास खाडीत सोडले जाते. यामुळे नदीचे प्रदूषण वाढले असून प्रदूषणामुळे उल्हास नदीला जलपर्णी वनस्पतींचा वेढा पडला. शासनाने शहरातुन व ग्रामीण परिसरातून सांडपाणी सोडणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.