ठाणे: गरिब, गरजू तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना शरीरविक्रयास भाग पाडणाऱ्या एका पुरुष दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने अटक केली. त्याच्या तावडीतून तीन पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. कोपरीतील शिवम हॉटेल समोर काही मुलींना शरीर विक्रयाच्या व्यवसायासाठी आणले जाणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.
त्याच आधारे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने १२ मार्च २०२४ रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास कोपरीतील स्टेशन रोड भागातील या हॉटेल समोर सापळा रचून एका दलालास ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून तीन पिडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. या आरोपीविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात कलम ३७० तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पिडित मुलींना ठाण्यातील एका विशेष सुरक्षागृहात ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्याचे आणखी काेणी साथीदार आहेत का? त्याने आणखी काेणत्या मुलींना या रॅकेटमध्ये ओढले आहे का? याचाही तपास केला जात असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. व्हॉटसॲपवर पाठवले जायचे तरुणींचे फोटो -व्हॉटसॲपवर फोटो पाठवून सेक्स रॅकेटसाठी या मुलींचा सौदा केला जात होता. एका गिऱ्हाईकाकडून पाच हजार रुपये एका मुलीसाठी घेतले जायचे. त्यातील दीड हजार रुपये या मुलीला तर उर्वरित रक्कम हा दलाल स्वत:ला घेत होता. सौदा झाल्यानंतर या मुलींना ठाण्यासह गोवा, पुणे, मुंबई आणि लोणावळा परिसरात पाठवित होता, अशीही माहिती तपासात समोर आली आहे.