ठाणे : कल्याणमधील एका हाॅटेलमध्ये काही असहाय तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या दाेन महिला दलालांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक चेतना चाैधरी यांनी रविवारी दिली. त्यांच्या तावडीतून चार पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेकडील सुभाषनगर भागातील ‘अनुभव स्पाइस तडका, फॅमिली रेस्टाॅरंट’ हाॅटेलमध्ये काही महिला दाेन तरुणींना देह विक्रयासाठी आणणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली हाेती. माहितीच्या आधारे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पाेलिस निरीक्षक चेतना चाैधरी, उपनिरीक्षक डी. व्ही. चव्हाण, स्नेहल शिंदे, हवालदार राजेश सुवारे आणि विजय पाटील आदींच्या पथकाने २२ मार्च २०२५ राेजी दुपारी ३:२५ वाजता हाॅटेलमध्ये छापा टाकला.
त्यावेळी एका बनावट गिऱ्हाइकाच्या मदतीने त्यांनी दाेन महिला दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून चार पीडित तरुणींची सुटका केली. या दाेन्ही महिलांविराेधात बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलींना उल्हासनगर येथील सुधारगृहात ठेवण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.