ठाणे : भाईंदर येथील चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मोहम्मद युनूस उर्फ झिरो उर्फ झिरु हाजी मोहम्मद शहा (२४) या आरोपीला अजन्म कारावास, तसेच विविध कलमांखाली १३ हजारांच्या दंडाची, तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांना चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी सोमवारी सुनावली. जानेवारी, २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. यातील मोहम्मद युनूस याने त्याच भागातील अल्पवयीन मुलीचे चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण आणि नंतर निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर, मोहम्मद शहा याच्यासह त्याचे साथीदार मोहम्मद रोजन उर्फ लंगडा राईनी आणि जितेंद्र उर्फ जितू तिरथप्रसाद राव यांनी मिळून नाल्यातील गाळामध्ये तिचा मृतदेह बुजवून पुरावा नष्ट केला. या प्रकरणी ठाणे ग्रामीण नवघर पोलीस ठाण्यात खून, अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा तर आरोपींना १४ जानेवारी, २०१७ रोजी अटक केली.पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये १२ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीचे कपडे, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, वैद्यकीय अहवाल आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीमध्ये भक्कम पुरावा सरकारी पक्षातर्फे पोलीस आणि सरकारी वकील उज्ज्वला मोहळकर यांनी न्यायालयात सादर केला. आरोपींना जास्त शिक्षा देण्याचीही मागणी लावून धरली.
लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:16 AM