सदानंद नाईक
उल्हासनगर : एका २९ वर्षांच्या महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उल्हासनगरात उघड झाली. याप्रकरणी एका साप्ताहिक व यूट्यूब वाहिनीच्या पत्रकाराविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी अत्याचाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
कल्याण मध्ये राहणारी महिला पत्रकार ही विवाहित असतानाही आरोपी तीला लग्नासाठी गळ घालत होता. त्यास तिने नकार दिल्याने आरोपीने तिच्या पतीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तक्रारीत महिलेने म्हटले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारदार आणि आरोपी पत्रकार हे कल्याणमध्ये राहतात. मात्र गुन्ह्याची घटना उल्हासनगरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला या पत्रकार आहेत. त्या आरोपी पत्रकाराच्या यूट्यूब वृत्त वाहिनीमध्ये नोकरी करतात. आरोपी पत्रकाराने या महिलेशी कार्यालयात काम करत असल्याने ओळख वाढवली होती. मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाल्यानंतर लग्न करण्याची गळ घातली. तसेच लग्नानंतर सौदी अरेबियात पर्यटनासाठी नेण्याची व पलावा गृहसंकुलात अलिशान घर घेण्याचे आमिष दाखविले.
महिला पत्रकार व आरोपी पत्रकार यांच्यात अनेक वर्षांपासूनची ओळख आहे. महिलेच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली. आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नसून पोलीस तपास सुरू असल्याचे अवताडे म्हणाले आहे.