ठाणे : ठाण्याच्या नौपाडा भागातील एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून औरंगाबाद येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या भावेश अर्जून धोत्रे (१९, रा. नागोबाची वाडी, हरिनिवास सर्कल, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.दोघेही एकाच परिसरात राहणारे. आधी केवळ तोंडओळख. नंतर व्हॉटसअॅपमुळे सलगी वाढली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर दहावीची परीक्षा होताच पळून जाण्याचा दोघांनी निर्णय घेतला. झालेही तसेच २२ मार्चला दहावीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगून ती घराबाहेर पडली. जातांना तिने मोबाईलही घरातच ठेवला. त्यामुळे तिचा काहीच संपर्क होत नव्हता. दिवसभर वाट पाहिल्यानंतर २३ मार्च रोजी तिच्या कुटूंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्येच त्यांनी भावेशवर संशय व्यक्त केला होता. पण, त्यानेही मोबाईल नेला नव्हता. त्यामुळे काहीच शोध लागत नव्हता. दरम्यान, त्याने २४ मार्च रोजी औरंगाबद येथील एका महादेवाच्या मंदीर परिसरातून घरी आईला ख्याली खुशालीचा फोन केला. तेंव्हा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती आईने दिली. पण, तरीही आता लग्न केले असल्याचे त्याने सांगितले. ही माहिती मिळताच नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश राऊत यांच्या पथकाने औरंगाबद येथे त्याला पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र, तिथून तो निसटला. नंतर त्याच्या कुटूंबियांना विश्वासात घेऊन त्याला औरंगाबाद येथून आणण्याचे आवाहन पोलिसांनी केले. कुटूंबियांच्या आवाहनानंतर तो त्या मुलीसह औरंगाबाद रेल्वे स्थानक येथे बुधवारी (२८ मार्च ) रोजी आला. तिथून त्याच्या कुटूंबियांच्याच मदतीने धुमाळ यांच्या पथकाने त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून अपहृत मुलीची सुखरुप सुटका केली. एका चिकन सेंटरमध्ये काम करणारा भावेश कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचा अंदाज घेऊन पोलिसांनी अत्यंत संयम आणि संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळून यशस्वीपणे तपास केला........................अवघ्या १२०० रुपयांमध्ये लग्नमुलीला लग्नासाठी मन वळविल्यानंतर तिने घरातून ५०० तर त्याने ७०० रुपये घेतले. हेच पैसे घेऊन त्यांनी औरंगाबाद गाठले. तिथे भटजी आणि दोघांच्याही नातेवाईकांशिवाय केवळ एकमेकांना हार घालून लग्न केल्याची कबुली त्याने दिली. मंदीर परिसरातच ते राहिले. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचीही माहिती तपासात उघड झाली.
ठाण्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून औरंगाबादेत लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 7:45 PM
नौपाडयातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मुलाचा थेट औरंगाबाद येथून ठाणे पोलिसांनी शोध घेतला. मोबाईल घरातच ठेवून दोघेही पसार झाले होते. आईला त्याने फोन केल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला.
ठळक मुद्देलग्नासाठी दोघांनीही घरातून नेले १२०० रुपयेमोबाईल घरीच ठेवलेआईला त्याने फोन केल्यानंतर लागला शोध