ठाणे : बांगलादेशी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून भारतात आणून तिला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलणा-या शेहग इस्लाम (२५) आणि लियान मुल्ला (२०) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. त्यातील शेहग हा मामा तर लियान हा त्याचा भाचा आहे.अल्पवयीन मुलीला कळव्यामध्ये विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. तिच्या आधारे संबंधित विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे ७५ हजार रुपये देण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली. त्याने ६ डिसेंबरला दुपारी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ येत असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे शेहग आणि लियान तिथे आले आणि पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्या तावडीतून या मुलीची सुटका केली. लियान याने या मुलीला बांगलादेशातून लग्नाच्या आमिषाने एक महिन्यापूर्वीच भारतात आणले. नंतर, बंगळुरूमध्ये त्याच्या आत्याने तिला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलले. महिनाभर तिच्यावर अनेकांनी अत्याचार केले.त्यानंतर, मुंबईत जायचे असल्याचे सांगून तिला त्यांनी वाशीत आणले. तिथूनच ते तिची विक्री करण्याच्या बेतात असतानाच ठाणे पोलिसांनी त्यांना अटक करून तिची सुटका केली.
बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:39 AM