लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लग्नाच्या अमिषाने एका १५ वर्षांच्या मुलीला पळवून तिच्याशी विवाह केल्याचा बनाव करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कथित पती साकीर पठाण याच्यासह चौघांविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चौघांचाही शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती चितळसर पोलिसांनी शुक्रवारी दिली.
ठाण्यातील गांधीनगर भागात राहणाऱ्या या पीडितेशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. १५ मे ते ९ सप्टेंबर २०२२ या दरम्यान साकीर याने मोबाइलवर गप्पा मारत तिला लग्नाची गळ घातली. त्यानंतर त्याने औरंगाबाद येथे नेऊन एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तिच्याशी निकाह केला. त्यानंतर त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पुढे बिहारमधील मुझफ्फर येथे नेऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. या प्रकाराचा कहर झाल्याने अखेर तिने ठाण्यातील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने साकीरसह दीर कादीर, चुलत सासरा मनान आणि दिलशान यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल केला. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी दिली.