ठाणे : दुरवस्थेच्या विळख्यात अडकलेल्या घोडबंदर रोड येथील एस.जी. इंग्रजी शाळेबाबत मनसे विद्यार्थी सेनेने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन सदर शाळेला नोटीस बजावून येत्या आठ दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास तिची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, असे पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, शाळेची अत्यंत दुरवस्था असल्याचा दुजोराही त्यांनी दिला.शाळेतील पत्र्यांच्या भिंती, दरवाजे नसलेले शौचालय, तोडकीमोडकी बैठकव्यवस्था अशी एस.जी. इंग्रजी शाळेची अवस्था मनसे विद्यार्थी सेनेने ठाणे महापालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाच्या मनविसेचे ठाणे शहराध्यक्ष किरण पाटील यांनी निदर्शनास आणली होती. मनसे विद्यार्थी सेनेचे निवेदन प्राप्त झाल्यावर पालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेला भेट दिली. त्यावेळी ही शाळा बंद होती. त्यामुळे पालिकेच्या शिक्षणाधिकारी ऊर्मिला पारधे यांनी त्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा, या शाळेबाबत शासनस्तरावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.>शाळेला नोटीस बजावली असून त्यात अनेक प्रश्न त्यांना विचारले आहेत. आठ दिवसांत उत्तर न आल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल. - ऊर्मिला पारधे, शिक्षणाधिकारी, ठामपा>पालिका कारवाईच्या नावाखाली काय करते, ते पाहणार अन्यथा मनसे स्टाइलने धडा शिकवला जाईल. या शाळेची मान्यता रद्द करावी, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. - किरण पाटील, मनविसे
एस.जी. इंग्रजी शाळेला ठामपाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 12:31 AM