ठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका, याशिवाय मुंबईला मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. सुमारे २८ गावांसह ५५ पाडे आदी ८३ गावखेड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून त्यांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.यंदा जिल्ह्यातील शहापूरसह मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांतील काही गावपाडे पाणीटंचाईला तोंड देत आहेत. या टंचाईची चाहूल लागताच लोकमतने ४४८ पाड्यांना पाणीटंचाई, या मथळ्याखाली ५ मार्चला वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनास जागृत केले आहे. याची त्वरित दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने १६ मार्चला कोळीपाड्यासाठी पहिला टँकर सुरू केल्याचे निदर्शनात आले. भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाईची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मुरबाडच्या तीन गावे व तीन पाड्यांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर, शहापूरच्या १५ मोठ्या गावांसह ५२ आदिवासीपाड्यांच्या तीव्र टंचाईने प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर, वेळीच उपाययोजना म्हणून १६ टँकरद्वारे २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. शहापूरमधील अजनूप, गोलभण, दाड, जरडी, उम्रावण, कळभोंडे, विहिगाव, माळ, पाटोळ आणि घाणेपाडा या १० मोठ्यांसह ३० पाडे पाणीटंचाईला तोंड देत आहेत. यामध्ये कोळीपाडा, बिवळवाडी, नारळवाडी, पारधवाडी, आंब्याचापाडा, बोरीचापाड, पेट्याचापाडा,ओहळाचीवाडी, वरातेपाडा, कडूपाडा, भाकरेपाडा, चाफ्याचापाडा, वडपाडा, वडाचापाडा, काटीपाडा, नवीनवाडी, सावरवाडी, मेंगाळपाडा, भस्मेपाडा, चिंतामणवाडी, बोंडारपाडा, ठाकूरपाडा,जांभूळपाडा, राईचीवाडी, काळीपाडा, कुंभईवाडी, सुगाव आणि वारलीपाडा या दुर्गमभागातील गावखेडे तीव्र टंचाईला तोंड देत आहेत.त्यावरील उपाययोजना म्हणून ३० टँकर या ४० गावखेड्यांना रात्रंदिवस पाणीपुरवठा करत आहेत. काही ठिकाणी गावकरी टँकरवर पाणी भरत आहेत.तर, काही ठिकाणी विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडले जात आहे. त्यातून महिलावर्ग पाणी काढून कुटुंबाची तहान भागवत असल्याचे वास्तव शहापूर तालुक्यात आहे. मागील वर्षी या शहापूरच्या १६ गावांसह ५८ आदिवासीपाड्यांना मागील वर्षी १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र ही संख्या वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
शहापूर-मुरबाड तालुक्यांत पाणीटंचाईने ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:31 AM