अनिकेत घमंडी / डोंबिवली शहराचे आकर्षण असलेल्या कॅ. विनयकुमार सच्चान स्मारकातील रणगाड्याच्या डागडुजीला प्रारंभ झाला आहे. रंगरंगोटी, खराब झालेले लोखंडी भाग बदलणे यासह अन्य तांत्रिक कामांचा त्यात समावेश आहे. विद्यानिकेतन शाळेकडे या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी आहे. १९६५ मधील झालेल्या कच्छच्या युद्धभूमीचा इतिहास सांगणारा हा रणगाडा डोंबिवलीतील शहीद कॅ. विनयकुमार सच्चान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एमआयडीसीच्या घारडा सर्कल परिसरात बसवण्यात आला. हे स्मारक-स्फूर्तीस्थळ म्हणून ओळखले जाते. दोन वर्षांपासून विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची देखभाल करण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रीय संपत्तीची जपवणूक करणे हे कर्तव्य समजून डागडुजी करण्यात येत असल्याचे पंडित म्हणाले.स्मारकाच्या या कामासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. देशसेवेकरिता आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगत त्यांनी डागडुजीच्या कामासाठी येणाऱ्या खर्चाकरिता कुणालाही मदतीचे आवाहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अद्ययावत तंत्राद्वारे रंगरंगोटी, लोखंडी भाग खराब होऊ नयेत, यासाठीची उपाययोजना करण्यात येत आहे. डोंबिवलीतील एक कारगॅरेज व्यावसायिक सुरेश शेट्टी यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर ही सेवा करणार असल्याचे शेट्टी म्हणाले. रणगाड्याला जवानांच्या गणवेशासाठी जो रंग असतो तसा रंग लावण्यात येणार असून तो दीर्घकाळ टिकण्यासाठी रंगांच्या दर्जासह अन्य कामांबाबत तडजोड केली जाणार नाही, असे पंडित यांनी आवर्जून सांगितल्याचे शेट्टी म्हणाले. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरीक, शाळांमधील शिक्षक - विद्यार्थी या स्मारकाचे नवे रूप न्याहाळू शकतील.
शहीद स्मारकाला मिळणार नवी झळाळी
By admin | Published: January 13, 2017 6:38 AM